जुन्या मिग-२१ ने पाकिस्तानचे आधुनिक एफ-१६ विमान कसे पाडले

 जुन्या मिग-२१ ने पाकिस्तानचे आधुनिक एफ-१६ विमान कसे पाडले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हाती पडले ही बाब दुर्दैवी असली, त्यांनी मिग-२१ या तुलनेने जुन्या असलेल्या लढाऊ विमानातून पाकिस्तानचे आधुनिक एफ-१६ विमान पाडले ही कौतुकास्पद बाब आहे.

एफ-१६ हे पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील अमेरिकेकडून घेतलेले अत्याधुनिक विमान; तर भारताने तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून १९९३ मध्ये मिग-२१ विमाने विकत घेतली. या दोन्ही विमानांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असल्या, तरीही एफ-१६ हे काहीसे वरचढ समजले जाते.

बुधवारी सकाळी पाकिस्तानची एफ-१६ विमाने भारतीय हद्दीत घुसली तेव्हा भारताची मिग-२१ विमाने कॉम्बॅट एअर पेट्रोल म्हणजे हवाई गस्तीवर होती. ती तातडीने एफ-१६ च्या मागावर पाठवण्यात आली. या हवाई संघर्षात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एक एफ-१६ पाडले. वर्धमान यांनी मिग-२१ विमानातून रशियन आर-७३ प्रकारचे क्षेपणास्त्र डागून एफ-१६ पाडल्याचे सध्या मानले जात आहे.
रशियाने त्यांच्या ताफ्यातील मिग-२१ विमानांचे १९९० च्या दशकात आधुनिकीकरण केले. त्यानंतर भारतानेही हवाई दलातील साधारण ११० मिग-२१ विमानांचे २००६ च्या दरम्यान आधुनिकीकरण (अपग्रेडेशन) केले. या सुधारित विमानांना मिग- बायसन असे नाव दिले आहे. त्यात जुन्या यंत्रणा बदलून अनेक नवीन यंत्रणा बसवल्या आहेत. मिग-२१ बायसनच्या कॉकपिटमध्ये अत्याधुनिक एव्हिऑनिक्‍स यंत्रणा आणि अन्य उपकरणे बसवली आहेत. त्यावर नवे मल्टि-मोड रडार बसवले आहे. सध्याच्या आधुनिक विमानांप्रमाणे त्याच्या वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्यासंबंधी उपयुक्त माहिती पाहण्याची सोय केली आहे. त्याला हेल्मेट-माऊंटेड डिस्प्ले म्हणतात. जुन्या मिग-२१ विमानांच्या कॉकपिटची कॅनॉपी किंवा काचेचे आवरण वैमानिकाला चौफेर दृष्टी फिरवण्यात अडचण आणत असे. आता त्याऐवजी सर्वत्र नजर टाकता येईल अशी रॅप-अराऊंड कॅनॉपी बसवली आहे. तसेच मिग-२१ बायसनवर रशियन आर-७३ आर्चर आणि आर-७७ अँडर ही हवेतून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे बसवली आहेत. त्यातील आर-७३ लघु पल्ल्याचे म्हणजे ३० कि.मी.पर्यंत मारा करणारे; तर आर-७७ हे मध्यम पल्ल्याचे म्हणजे १०० कि.मी.पर्यंत मारा करू शकते. या क्षेपणास्त्रांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा अडीच ते तिप्पट म्हणजे ताशी साधारण ३००० कि.मी. इतका आहे. ही क्षेपणास्त्रे बसवल्याने मिग-२१ बायसनला दृष्य मर्यादेच्या पलीकडील (बियाँड व्हिज्युअल रेंज- बीव्हीआर) लढतीत बळ मिळाले आहे.
मिग-२१ आकाराने लहान आणि त्रिकोणी पंखे (डेल्टा विंग्ज) असलेले विमान असल्याने चपळ आहे. एफ-१६ त्यापेक्षा अधिक आधुनिक मानले जाते. तरीही नव्या सुधारणा केलेले मिग-२१ बायसनचे सारथ्य जर अनुभवी आणि कुशल वैमानिक करत असेल, तर ते एफ-१६ ला मात देऊ शकते. नेमके हेच कौशल्य विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवले आहे. एफ-१६ वरही एआयएम- ॲडव्हान्स्ड मीडियम रेंज एअर-टू-एअर मिसाईल (आमराम) होते, पण भारताचे मिग-२१ त्याने पाडल्याचे पुरावे अद्याप नाहीत.

भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी अशाच प्रकारे १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही आपल्या कौशल्याच्या जोरावर पाकिस्तानची तत्कालीन एफ-८६ सेबर आणि एफ-१०४ स्टार फायटर ही आधुनिक विमाने कमी क्षमतेची नॅट विमाने वापरून पाडली होती.

Web Title: Indian Air Strike: How did the old MiG-21 get F-16?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com