'चांद्रयान-2' प्रक्षेपणाची तारीख दहा दिवसांनी जाहीर होणार  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' या अवकाश यानाचे उड्डाण सोमवारी पहाटे नियोजित वेळेच्या 56 मिनिटे आधी स्थगित करण्यात आले. फ्युएल कंडक्‍टरमध्ये बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले. आता प्रक्षेपणाची तारीख दहा दिवसांनी जाहीर केली जाईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थने (इस्रो)ने सांगितलंय. 

नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' या अवकाश यानाचे उड्डाण सोमवारी पहाटे नियोजित वेळेच्या 56 मिनिटे आधी स्थगित करण्यात आले. फ्युएल कंडक्‍टरमध्ये बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले. आता प्रक्षेपणाची तारीख दहा दिवसांनी जाहीर केली जाईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थने (इस्रो)ने सांगितलंय. 

आंध्र प्रदेशमधील श्रहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज पहाटे 2.51 मिनिटांनी "चांद्रयान-2'चे प्रक्षेपण होणार होते. "बाहुबली' म्हणजेच "जीएसएलव्ही एमके-3' या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयान-2 अवकाशात झेप घेणार होते. मात्र इंजिनमध्ये क्रायोजनिक इंधन भरताना तांत्रिक अडचण आल्याने 56 मिनिटे 24 सेकंद बाकी असताना 1 वाजून 55 मिनिटांनी प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय मोहीम नियंत्रण केंद्राने घेतला. याची नेमकी माहिती "इस्रो'कडून अधिकृतपणे जाहीर होईपर्यंत नेमके काय झाले, याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रक्षेपणाची नवी तारीख लवकरच निश्‍चित केली जाईल, असे "इस्रो'चे सहसंचालक (जनसंपर्क) बी. आर. गुरुप्रसाद यांनी सांगितले. "चांद्रयान-2'च्या प्रक्षेपणासाठी "इस्रो'ने गेल्या आठवड्यात रंगीत तालीम घेतली होती. त्यानंतर रविवारी (ता.14) सकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी उलट गणती सुरू झाली होती. 

राष्ट्रपतींची उपस्थिती 
चांद्रयानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे श्रीहरीकोटा येथे उपस्थित होते. उड्डाणाची वेळ थोडी विचित्र असली तरी उत्साही प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. देशाच्या या महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी काही जण तर दुचाकीवरून दीर्घ प्रवास करून आले होते. "इस्रो'ने खास उभारलेल्या गॅलरीत सर्व वयोगटातील महिला, पुरुष व मुले प्रक्षेपणाकडे डोळे लावून बसले होते; परंतु उड्डाण रद्द झाल्याचे जाहीर केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. 

तीन वेळा तारीख पुढे ढकलली 
'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण या पूर्वीही तीन वेळा पुढे ढकलण्यात आले होते. सर्वांत प्रथम ऑक्‍टोबर 2018 मध्ये "चांद्रयान-2' आकाशात उड्डाण करणार होते. नंतर ही तारीख बदलण्यात येऊन 3 जानेवारी व पुन्हा 31 जानेवारी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणाने 15 जुलैपर्यंत ही तारीख पुढे ढकलण्यात आली. आता आजही तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण तात्पुरते रद्द करण्यात आले. 

'आम्ही परत येऊ' 
नेमके काय झाले हे माहीत नाही; पण आम्ही खूप निराश झालो. जी समस्या असेल ती लवकरच सुटेल, अशी अपेक्षा आहे. प्रक्षेपण पाहण्यासाठी आम्ही परत येऊ, अशी प्रतिक्रिया एका युवकाने दिली. तो त्याच्या कुटुंबासह "चांद्रयान-2'चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आला होता. "चांद्रयान जमिनीवर असतानाच प्रक्षेपण रद्द करण्याचा योग्य निर्णय शास्त्रज्ञांनी घेतला. जर ते अवकाशात झेपावले असते आणि काही बिघाड झाला असता तर या प्रकल्पावर केलेला प्रचंड खर्च वाया गेला असता,'' असे सांगत एका प्रेक्षकाने शास्त्रज्ञांचे कौतुक केले. 

सर्वांत कमी खर्चातील मोहीम (आकडे कोटी रुपयांत) 

978 कोटी 
चांद्रयान -2 (भारत) 

1200 
चॅंग ई-4 (चीन) 

1400 
बेअरशिट (इस्राईल) 

 

WebTitle : marathi news isro to announce date of re launching of chandrayaan 2 after ten days 


संबंधित बातम्या

Saam TV Live