वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना त्रास

वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना त्रास

जळगाव - शहरासह जिल्ह्यातील तापमानाने सद्यःस्थितीत पंचेचाळिशी ओलांडल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ‘मे हीट’च्या तडाख्यापूर्वीच ‘एप्रिल एंड’ला तापमानात वाढ झाली आहे. परिणामी डोळ्यांचा त्रास वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या आठ- दहा दिवसांमध्ये डोळ्यांचा त्रास झालेल्या रुग्णसंख्येत पाच ते दहा टक्‍के वाढ झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

शरीरातील नाजूक अवयवांपैकी एक अवयव म्हणजे डोळा. याची निगा राखणे महत्त्वाचे असते. याकरिता योग्य आहार, स्वच्छता, डोळ्यांचे संरक्षण करणे अपेक्षित आहे. प्रामुख्याने उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर डोळ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. यामध्ये डोळा दुखणे, लाल होणे, पाणी येणे अशा समस्या जाणवतात. डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी नेत्रतज्ज्ञांना दाखविणे गरजेचे असते. नेत्रपटलास युव्ही लाईटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो. त्यासाठी उन्हाळ्यात घराबाहेर पडताना टोपी किंवा रुमाल, स्कार्फ व गॉगल वापरण्याचे सुरक्षित असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले. 

रुग्णसंख्या वाढली
जळगावातील तापमान ४५ अंशावर असल्याने डोळ्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. हवेत पसरणारे परागकण तसेच हवेतील धुळीमुळे डोळ्यांना ॲलर्जी होऊन खाज येणे, पाणी येणे, लाल होणे अशी लक्षणे आढळतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने जळगावात सध्या ५ ते १० टक्‍के रुग्ण वाढले आहेत. शिवाय टी.व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्यांना हवेतील उष्मा वाढल्यामुळे डोळ्यांतील अश्रूंची वाफ लवकर होऊन डोळे कोरडे पडत असतात. यामुळे डोळ्यांची आग, डोळ्यांना टोचणे, खाज येणे, पाणी येणे असा त्रास सुरू होतो.

चांगल्या सनग्लासेसचा हवा वापर
डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेसचा वापर आवश्‍यक आहे. रस्त्यांवर गॉगल विक्री केली जाते; या गॉगलच्या काचा डोळ्यांना घातक ठरू शकतात. पाण्यात पोहताना गॉगलचा वापर आवश्‍यक आहे. कारण तरणतलावात क्‍लोरिन व अन्य रसायने मिसळली जातात. तलावाबाहेर आल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे. तसेच ज्या व्यक्ती कॉन्टॅक्‍ट लेन्स वापरतात; त्यांनी आगीजवळ जाणे टाळावे. यामुळे कॉन्टॅक्‍ट लेन्सला उष्णतेचा परिणाम होऊन कॉर्नियाला इजा होऊ शकते.

उन्हाळा वाढल्याने डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नेत्रपटलास इजा होऊन डोळ्यांची चुळचुळ, लाल होण्याच्या तक्रारी अधिक आहेत. यामुळे नेत्ररोगतज्ज्ञांकडून उपचार करून घेण्यासह प्राथमिक उपाय करणे आवश्‍यक आहे.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्र रोगतज्ज्ञ तथा सचिव, आय. एम.ए.

Web Title: Eye Problem Increase by Temperature

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com