भाजपच्या विरोधात काढलेली यात्रा की नेत्यांची 'सेलिब्रेशन टूर' ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापुरात आली त्यावेळी भाजपच्या विरोधात काढलेली यात्रा आहे की नेत्यांची 'सेलिब्रेशन टूर' असा प्रश्‍न निर्माण झाला. अनेक ठिकाणी झालेल्या जंगी स्वागताने त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

सोलापूर : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापुरात आली त्यावेळी भाजपच्या विरोधात काढलेली यात्रा आहे की नेत्यांची 'सेलिब्रेशन टूर' असा प्रश्‍न निर्माण झाला. अनेक ठिकाणी झालेल्या जंगी स्वागताने त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने जनतेची फसवणूक केली. जाहीर केलेल्या घोषणा कागदावरच राहिल्या. यासह अनेक मुद्दे सांगत जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली होती. मात्र, सोलापुरात आल्यानंतर या यात्रेचे झालेले स्वागत पाहता ही संघर्ष यात्रा होती की 'सेलिब्रेशन टूर' असा प्रश्‍न पडला. यात्रेच्या नावात 'जन' असले तरी खरोखरच किती जनता त्यात सहभागी होती हाही संशोधनाचा विषय होईल. नेत्यांच्या वाहनासमोर दुचाकीवर स्वार असलेल्या कार्यकर्त्यांचे हावभाव पाहिले तर ते सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत की मौजमजा करायला असा प्रश्‍न पडला होता. 

यात्रेदरम्यान नेत्यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून जनतेशी थेट संवाद साधणे अपेक्षित होते. मात्र, सजवलेल्या वाहनात उभे राहून अभिवादन करण्याचीच भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे, काँग्रेसचे कुणीतरी नेते आलेत आणि कार्यकर्ते त्यांचे क्रेनच्या मदतीने मोठाले हार घालून स्वागत करत आहेत, अशीच चर्चा जनमानसात होती. यात्रेसमोर दुचाकीवर असलेल्या कार्यकर्त्यांचा हुर्रे पाहून ही संघर्ष यात्रा आहे असे कोणालाही वाटले नाही. त्या यात्रेसाठी काँग्रेस कार्यकर्त्याशिवाय कोणी थांबले नाही. जनता आपल्या कामात गर्क होती. अडचण झाली ती रस्त्यावरच्या वाहनांची. यात्रेमुळे अनेक ठिकाणी कोंडी झाली, ती सोडविता सोडविता वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. 

देश व राज्यात भाजप विरोधी वातावरण असताना त्याचा चांगला फायदा कॉंग्रेसच्या नेत्यांना या यात्रेच्या माध्यमातून करून घेता आला असता. यात्रेदरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर उतरून थेट जनतेशी संवाद साधला असता तर भाजपच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला संघर्ष यात्रा आल्याची जाणीव तर झाली असती, पण भाजपवर टीका करण्याचे काम फक्त सभात झाले, ते ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. सामान्य कोणीही नव्हते. मग या यात्रेचा उद्देश खरोखरच सफल झाला का, याचे आत्मचिंतन काँग्रेसच्या नेत्यांनी करणे आवश्‍यक आहे. 

वेळेचे काटेकोर नियोजन व्हावे -
राज्यस्तरावर नियोजन होणाऱ्या यात्रांच्या वेळेचे नियोजन केले जाते. मात्र, ते प्रत्यक्षात पाळले जात नाही. त्यामुळे काहीवेळा फज्जा उडतो. यात्रेला मिळालेल्या जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे झालेला उशीर समजून घेतला जाऊ शकतो, पण गांभीर्य नसल्याने वेळकाढूपणा काढण्याचे प्रकार झाले तर, मग पंढरपूरसारखा फज्जा उडतो. याची गंभीर दखल नियोजनकर्त्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live