लक्षणं नसताना का अडवताय गरिबांचे बेड? श्रीमंतांचा पैसा कोरोनाग्रस्त गरिबांच्या मुळावर

साम टीव्ही
बुधवार, 2 सप्टेंबर 2020
  • लक्षणं नसताना का अडवताय गरिबांचे बेड?
  • श्रीमंतांचा पैसा कोरोनाग्रस्त गरिबांच्या मुळावर
  • बेड न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकरांचं निधन

आता बातमी आरोग्य यंत्रणेच्या अनागोंदीची. श्रीमंत लोक पैशांच्या जोरावर ICU बेड अडवत असल्यामुळे गरिबांना बेड मिळत नसल्याचं समोर आलंय. खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. या सगळ्या अनागोंदीमुळे पुण्यात टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांना जीव गमवावा लागलाय. चला तर मग पाहुयात. कशा उडल्यात आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या.

कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक पैशांच्या जोरावर आयसीयू बेड अडवून ठेवत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे, कित्येक गोरगरीब कोरोनाग्रस्तांना बेड अभावी जीव सोडावा लागतोय. त्यामुळे लक्षण नसलेल्या कोरोनाग्रस्तांना आयसीयू बेड द्यायला नको असे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेयत.

पुण्यात पत्रकार असलेल्या पांडुरंग रायकर यांचं निधन झालंय. सरकारने उभ्या केलेल्या जम्बो केअर सेंटरमध्ये ते अॅडमिट होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला गेला, पण रात्रभर प्रयत्न करूनही अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. पहाटे कशीबशी एक अॅम्ब्युलन्स मिळाली, तर तिच्यात व्हेंटिलेटर नाही. दुसरी अॅम्ब्युलन्स आली तर तिच्याच डॉक्टर नाही. या सगळ्या अनागोंदीत श्वास घेता न येणाऱ्या पांडुरंग रायकर यांचं गुदमरून निधन झालं. प्रसार माध्यमांसह सर्वच पातळ्यांवर आवाज उठल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय.

चौकशा होतील, अहवाल येतील. कागदावर शेरे मारले जातील. पण या सगळ्यात रायकर यांचा जीव गेला तो कोण आणि कसा भरून देणार. एका बाजूला लक्षणं नसलेले श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवतायत. गोरगरीब जनता किड्यामुंग्यासारखी मरतेय. आणि दुसऱ्या बाजूला वेळेत उपचार न मिळाल्याने पांडुरंग रायकरांसारख्या पत्रकाराचाही जीव जातोय. सरकारी व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणा मुर्दाड झाल्याचा आणि तिच्या चिंधड्या उडाल्याचा हा मोठा पुरावा आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालंय. पण आपली संपूर्ण व्यवस्थाच मृत्यूशय्येवर गेलीय, हे यानिमित्ताने समोर आलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live