शिवसेनेशी पंगा कंगनाला महागात, शिवसेना विरुद्ध कंगना वादात काय घडलंय वाचा...

साम टीव्ही
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

 

  • शिवसेनेशी पंगा कंगनाला महागात
  • कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडलं
  • न्यायालयाच्या आदेशानंतर BMCनं तोडकाम थांबवलं

शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर अखेर हातोडा पडलाय. अनधिकृत बांधकाम केल्याचं कारण देत मुंबई मनपानं या कार्यालयात तोडकाम केली. पण न्यायालयाच्या आदेशानंतर हे तोडकाम थांबवण्यात आलं.

शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर अखेर हातोडा पडलाय. पाली हिल इथल्या कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली. कंगनानं आपल्या बंगल्यात 14 ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलंय.

तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली, असे बदल कंगनानं केल्याचं मनपानं म्हटलंय.

दरम्यान या साऱ्या गदारोळातच कंगनाच्या वकिलांनी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयाचं बांधकाम तोडण्याची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानं स्थगिती देण्यात आली. मात्र मुंबई मनपाच्या कारवाईवर कंगनाच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला.

मुंबई आणि मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेनं कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना हा वाद वाढत गेला. कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावरील कारवाई योग्यच आहे पण शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेला मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामं दिसत नाहीत का असा सवाल सामान्य नागरिक विचारतोय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live