परिस्थितीशी दोन हात करत उभारला संसार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

करमाळा - विहिरीत काम करताना एक पाय पूर्णपणे गमावलेले वडगाव (उ) येथील पोपट भानुदास शिंदे हे परिस्थितीशी दोन हात करत एका पायावर उभे राहत २२ वर्षे संसाराचा गाडा नेटाने हाकत आहेत. कृत्रिम पायाचा आधार घेत खडी फोडणे, पाइपलाइन खोदणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे सुरू आहे. गावात, शेतात इतर कामे करून यातून मिळणाऱ्या रोजंदारीवर ते घरप्रपंच चालवत आहेत. जणू संघर्ष हा पोपट शिंदे यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. संघर्षाशिवाय आतापर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्यात काही मिळाले नाही.

आपल्या संघर्षाविषयी बोलताना पोपट शिंदे यांनी सांगितले, ही घटना १९९७ ची आहे. विहीर खोदण्याच्या कामासाठी आठ ते दहा गडी वरवंड (जि. पुणे) परिसरात गेलो होतो. महिनाभर विहीर खोदण्याचे काम सुरू होते. सकाळी आम्ही सहा गडी ५० फूट खोल विहिरीत खोदकाम करत होतो. तोच अचानक विहिरीची एक बाजूच कोसळून खाली पडली. आमच्यापैकी दोन जण तर त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये माझा भाऊ हनुमंत शिंदे यांचा समावेश होता. इतर तीन जण वाचले. यात एकाचा मणका गेला तर माझा पाय गेला. कृत्रिम पाय बसवून मी सध्या आयुष्याची लढाई लढतो आहे. पोपट शिंदे दुचाकीदेखील चालवतात. पाय नाही याचे कसलेही दुःख न बाळगता ते काम करत आहेत. एक पाय नसल्याने कधी बसून तर कधी एका पायावर उभा राहून ते खडी फोडतात. या सर्व कामात त्यांची पत्नी सिंधुबाई यांची साथ मोलाची आहे. 

विहिरीत अपघात झाला आणि माझा पाय डोळ्यांदेखत तुटला. मला कसबसे विहिरीबाहेर काढले. वरवंड येथे प्रथमोपचार केल्यानंतर पुण्यात ससूनमध्ये दाखल झालो. सहा महिने शुद्धीवर नव्हतो. जेव्हा शुद्ध आली, तेव्हा पाय काढलेला होता. इन्फेक्‍शन झाल्याने पाय काढावा लागला, असे डॉक्‍टरांनी सांगितले. तब्बल एक वर्ष ससूनच्या वॉर्ड क्रमांक ३ मध्ये होतो. सुदैवाने डॉक्‍टर करमाळ्याचे होते. डॉ. सत्तार शेख यांनी उपचार करीत धीर दिला.
- पोपट भानुदास शिंदे

Web Title: Popat Shinde struggle

संबंधित बातम्या

Saam TV Live