महाराष्ट्रातले नेते म्हणजे भुंकणारे कुत्रे - कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

महाराष्ट्रातले नेते म्हणजे भुंकणारे कुत्रे - कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना गोळ्या घाला, या वादग्रस्त विधानाने सीमाभागासह महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन पेटल्याची घटना ताजी असताना कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र नेत्यांचा उल्लेख चक्क भुंकणारी कुत्री, असा करून अपमान केला आहे. 

महाराष्ट्रात अलिकडे विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सवदी यांनी महाराष्ट्रातील सीमाभागात भाजप उमेदवारांसाठी सभा घेतल्या. आता त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेने संतप्त भावना निर्माण झाली आहे. 

जैविक इंधनला चालना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री सवदी यांचे आज (ता.6) बेळगावात आगमन झाले होते. यावेळी ते बोलत होते. ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्‍वराप्पा, खासदार सुरेश अंगडीसह भाजप नेते उपस्थित होते. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न विषयी अलिकडे घडलेल्या घडामोडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा बेळगावात सत्कार झाला आहे त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता सवदी यांची चिभ घसरली. "कुत्री भुंकल्यानंतर आम्ही जाऊन काय त्याला चावायचे? कोणी महाराष्ट्रातून भुंकले तर त्याबद्दल डोके खाजवून घेण्याची गरज नाही. प्रमुख आणि जबाबदार पदावरून भाष्य केल्यास चर्चा करण्याची तयारी आहे. कोणी उठून काहीही बोलल्यानंतर त्याला उत्तर देण्याची गरज भासत नाही.'', असे ते म्हणाले.

''महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न संपला आहे. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग. निर्णय झाला आहे. विनाकारण सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. पण, तेथेही कर्नाटकाच्या बाजूने निकाल येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकादा आत्मपरीक्षण करावे. त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्‍नी काय भाष्य केले होते, पहिल्यांदा ते पाहावे. अविवेकी भाष्य करणे योग्य नाही. कोणी आले तरी बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली आहेत. 

महाराष्ट्रात सीमाप्रश्‍न चळवळ आणि लढ्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या विषयावर सवदी यांनी सीमाप्रश्‍न प्राधिकरण असून, प्राधिकरणाच्या अध्यक्षांची निवड लवकर केली जाईल. एका मंत्र्याकडे याचा पदभार देण्याबाबत मुख्यमंत्री विचार करत आहेत,'' असेही सवदी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पाठीशी; कर्नाटकात अन्याय 

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी ''भाजप नेते आणि पक्ष सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय सहन करणार नाही,'' असे विधान केले आहे. पण, भाजपच्या कर्नाटक नेत्यांकडून उलट प्रतिक्रिया येत आहेत. गुंड प्रवृत्तीच्या कन्नड म्होरक्‍यांकडून गोळ्या घाला, असे म्हटले जात तरी त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. तसेच कर्नाटक भाजप नेत्यांचाही तोल सुटल्याचे दिसून आहे. 

Web Title - karnataka deputy chief minister laxman savdi filthy language about maharashtra leaders

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com