महिलांच्या सुरक्षेसाठी केजरीवाल सरकारचा नवीन नियम

महिलांच्या सुरक्षेसाठी केजरीवाल सरकारचा नवीन नियम

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या अरविंद केजरीवाल सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गल्लीत (मोहल्ला) मार्शल म्हणजेच सुरक्षारक्षक तैनात करण्याची योजना आखली आहे. महिलांवरील अत्याचारांबद्दल दिल्लीची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याबरोबरच महिलांसाठी दिल्ली हे सर्वांत सुरक्षित शहर ठरले पाहिजे, या उद्देशाने ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. 

केजरीवाल यांनी दिल्लीतील परिवहन सेवेच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवास घडविण्याच्या योजनेची घोषणा केली; त्याच वेळी त्यांनी प्रत्येक बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी मार्शल तैनात करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. महिलांना बसमध्ये त्रास देण्याचे प्रमाण जास्त असल्याच्या अहवालानंतर केजरीवाल यांनी बसमध्ये मार्शलची घोषणा केली होती. त्यानंतर बसमध्ये मार्शल दिसू लागले व त्याचा चांगला परिणाम झाल्याचे फीडबॅक केजरीवाल यांना मिळाले. त्यानंतर शहराच्या प्रत्येक मोहल्ल्यात असे मार्शल तैनात का करू नयेत, अशी कल्पना पुढे आली. निवडणूक जिंकल्यावर पहिल्याच दिवसापासून ‘ॲक्‍शन मोड’मध्ये आलेल्या केजरीवाल यांनी नवीन योजनांच्या व आश्‍वासनांच्या अंमलबजावणीचा रोड मॅप तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, मोहल्ला क्‍लिनिक यांसारख्या जुन्या योजनाही तेवढ्याच गतीने चालू ठेवण्याच्याही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

घरपोच किराणा 
दिल्लीकरांना किराणा सामान दरमहा घरपोच देण्याची योजना केजरीवाल सरकारच्या विचाराधीन आहे. नागरी पुरवठा मंत्री इमरान हुसेन यांच्या मंत्रालयाने तयार केलेली ही योजना केजरीवाल यांनी मान्य केली आहे. हुसेन यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही योजना तत्काळ लागू करण्यासाठी तयारीचा आढावाही घेतला आहे. 

दिल्ली सरकारची आश्‍वासने : 
- डीटीसी बसमध्ये विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवास 
- यमुना नदीचे विषारी पाणी स्वच्छ करणार 
- २४ तास स्वच्छ पाणी 
- संपूर्ण प्रदूषणमुक्त दिल्लीसाठी लोकांच्या सहकार्याने जनआंदोलन 

सध्याच्या योजना 
- २०० किलोवॉटपर्यंत वीज व २० लिटरपर्यंत पाणी मोफत 
- डीटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास 
- प्रत्येक दिल्लीकरासाठी दर्जेदार आरोग्यसेवा, मोहल्ला क्‍लिनिक 
- प्रत्येक मुलाला पदवीपर्यंत दर्जेदार शिक्षणाची हमी. बोर्डात ६० टक्के मिळणाऱ्यांनाही प्रतिष्ठित महाविद्यालयांत प्रवेश देण्याची योजना 
- २४ तास अखंड वीजपुरवठा 
- अनधिकृत कॉलन्या व झोपडपट्ट्यांत साऱ्या सुविधा देणार 

Web Title: Kejriwal government plans for women safety

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com