शेतकऱ्यांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा - गिरीश महाजन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाशिकमधून काढलेला लॉंग मार्च आज विक्रोळीत धडकला. त्या वेळी शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12) चर्चा करून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, अशी ग्वाही दिली.

मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाशिकमधून काढलेला लॉंग मार्च आज विक्रोळीत धडकला. त्या वेळी शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12) चर्चा करून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, अशी ग्वाही दिली.

हा मोर्चा अत्यंत शिस्तीत, शांततेत आणि वाहतुकीला अडथळा न करता निघाला याबद्दलही त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. कनिष्ठ अधिकारी स्तरावर निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळाली नाही, हे खरे आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
शेतकरी व सरकार यांच्यात यापूर्वी झालेल्या चर्चेतील निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लढा सुरूच राहील - नवले
लॉंग मार्चमधील शेतकरी आणि सरकार यांच्यात उद्या (ता. 12) चर्चा होणार असली, तरी लढा सुरूच राहील, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी मोर्चादरम्यान सांगितले. मुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा करावी, असे आमंत्रण घेऊन आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता "देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आंदोलन व चर्चा या बाबी एकत्रच झाल्या पाहिजेत. आंदोलन सुरू झाले तेव्हाच चर्चा झाली असती तर सर्वांचा त्रास वाचला असता. एकीकडे चर्चा होत असताना लढाही सुरूच राहील, असे सूचक विधान त्यांनी केले. बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन ठाम आश्‍वासन मिळाले की चर्चा आणि लढा थांबेल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकांना हमीभाव, स्वामिनाथन अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, पेन्शन योजना आदी मुख्य मागण्या आहेत. याबाबत लेखी आश्‍वासन मिळावे तसेच विश्‍वासघात होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. दहावीची परीक्षा देणाऱ्या मुंबईतील मुलांची काळजी आम्हाला आहे. मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजीही आम्ही घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


संबंधित बातम्या

Saam TV Live