कोल्हापूरमध्ये सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिस पथकावर हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 एप्रिल 2019

कोल्हापूर -  यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची पिस्टलसुद्धा लंपास करण्यात आली. झटापटीनंतर यादवनगर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले.

कोल्हापूर -  यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची पिस्टलसुद्धा लंपास करण्यात आली. झटापटीनंतर यादवनगर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले.

शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, पोलिस अधीक्षकांसह शहरातील प्रमुख अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास सलीम मुल्लाची पत्नी आणि माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह १३ ते १५ जणांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस निरंजन पाटील हे शर्मा यांचे अंगरक्षक आहेत. त्‍यांच्‍या  हातातून एकाने पिस्‍टल काढून घेतली आणि त्‍यानेच त्‍यांना धमकी दिली, असे सीसीटीव्‍हीत स्‍पष्‍ट दिसत असल्‍याचे पोलिसांनी रात्री उशिरा सांगितले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - प्रशिक्षणातील अप्पर पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा पाच-सहा जण कर्मचाऱ्यांच्या पथकासह यादवनगरात सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. यादवनगरातील एमएसईबी युनिट शेजारीच असलेल्या ‘सलीम मुल्ला साहेब इंडियन ग्रुप’ या इमारतीच्या मागील बाजूस मटका अड्डा सुरू होता. साधारण साडेआठच्या सुमारास शर्मा यांच्या पथकाने येथे छापा टाकला. तेथील तरुणांनी मालक समोर राहत असल्याचे सांगितले. त्यामुळे शर्मा यांचे पथक मुल्ला यांच्या घराकडे जात होते. साधारण १५-२० फुटांवर असलेल्या घरात शर्मा यांचे पथक पोहोचण्यापूर्वीच स्थानिक महिला आणि तरुणांनी येथे मोठा गलबला केला.

यावेळी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह परिसरातील महिलांनी आणि तरुणांनी शर्मा यांच्या पथकावर चाल केली. दहा-पंधरा मिनिटाच्या झटापटीत शर्मा यांच्या अंगरक्षकांचे पिस्टल एका तरुणाने हिसकावून घेऊन त्याच पिस्टलने पथकाला दम दिला. यानंतर शर्मा यांना परत यावे लागले. याचवेळी पिस्टल लंपास झाल्याचे लक्षात आले. यानंतर या प्रकाराचे गांभीर्य वाढले. शर्मा यांनी याची माहिती पोलिस मुख्यालयाला दिली. 

तातडीने अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, एसटीचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासह एलसीबीचे तानाजी सावंत, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक वसंत बाबर, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह साधारण शंभर-सव्वाशे पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला. या ठिकाणी संशयित असलेल्या तरुणांना वेचून वेचून काढून पोलिस ताब्यात घेत होते. साधारण साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तास दीड तासाहून अधिक काळ पोलिसांनी सलीम मुल्लाच्या घराभोवती छावणीचे स्वरूप तयार केले होते. यामुळे परिसरात कोणती तरी गंभीर घटना घडल्याचे वातावरण दिसत होते.

काय घडले, हे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी हाकलून काढले. घटनास्थळी आलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकारांनाही पोलिसांनी सुरुवातीच्या टप्प्यात विरोध केला. पोलिसांनी कोणालाही थांबू दिले नाही. साधारण साडेदहाच्या सुमारास पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनाम्याची माहिती घेतली. यानंतर इंडियन ग्रुप लिहिलेल्या इमारतीच्या हॉलमध्येच बसून पुढील तपास आणि नेमकी वस्तुस्थिती काय, याची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिस छावणीचे स्वरूप होते.

सुमारे १५ जण ताब्यात
माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह सुमारे १३ ते १५ जणांना संशयित म्हणून राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. शमा मुल्ला या सलीम मुल्लाच्या पत्नी आहेत.

हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सलीम मुल्लाचे घर आणि मटका अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांनी छापा टाकला. यावेळी तेथे जमलेल्या तरुणांनी, महिलांनी त्यांच्या पथकावर हल्ला केला. सरकारी कामात अडथळा केला. त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकारांना दिली.

मटक्‍याच्या चिठ्ठ्या, रोकड जप्त
पंचनाम्यात मटक्‍याच्या चिठ्ठ्या, मोठ्या प्रमाणात रोकड आणि खासगी सावकारीची काही कागदपत्रे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

सीसीटीव्हीचे फुटेज तपासले
मुल्लाच्या घरासमोरच सीसीटीव्ही बसवले आहेत. ‘इंडियन ग्रुप’ इमारतीमागे त्याचा सर्व्हर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तो सर्व्हर ताब्यात घेतला. त्यातील सीसीटीव्ही फुटेज रात्री उशिरापर्यंत तपासण्यात येत होते.

ते आले आणि माघारी गेले...
माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, प्रा. जयंत पाटील घटनास्थळी धावून आले. प्रत्यक्षात प्रकार वेगळाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनीही तेथून काढता पाय घेतला.

Web Title: Attack on police raid squad in Kolhapur


संबंधित बातम्या

Saam TV Live