वाचा, कधीही न विसरता येणाऱ्या भयावह अशा कोल्हापूर महापुराची धडकी भरवणारी परिस्थिती

वाचा, कधीही न विसरता येणाऱ्या भयावह अशा कोल्हापूर महापुराची धडकी भरवणारी परिस्थिती

ऑगस्ट महिना सुरू होतोय. आज आठवण होतेय ती गेल्या वर्षीच्या म्हणजेच ऑगस्ट 2019 ची. खूप वाईट आणि भितीदायक वातावरणात हा महिना गेला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची संततधार सुरू होती. शेतीसाठी आणि धरण भरण्यासाठी हा पाऊस हवाहवासा वाटत होता, मात्र 1 ऑगस्टपासून याच पावसाने रौद्र रूप धारण केलं. रात्रदिवस पाऊस सुरु होता. याचा व्हायचा तो परिणाम झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच नद्यांचं पाणी पात्राबाहेर गेलं. मी 3 ऑगस्टला कामं संपवलं आणि घरी कराडला आलो.

दुसरया दिवशी रविवार असल्याने निवांत झालो असं वाटत होतं. रात्री दहा- अकरा वाजेंपर्यत पाऊस सुरु होता. झोप झाल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास जाग आली गॅलरीतून बघितलं पाऊस अक्षरशः सुपासारखा ओतत होता. मला काहीतरी अघटित घडणार असल्याची चिन्हं दिसली. पहाटे चारवाजेंपर्यत झोपच लागली नाही. चार वाजता कपड्यांची बॅग भरली, गाडी काढली आणि थेट कोल्हापूरकडे निघालो. पावसामुळं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहनं रस्त्याकडेला लावलेली.

जाताजाता माझा सहकारी कॅमेरामन सचिन सावंतला फोन केला. ऑफिसला यायला सांगितल. जाताना रस्त्यात थांबून वारणा नदीच तुडूंब भरलेलं पात्र बघितलं. शेजारचा सगळा ऊस पाण्यात गेला होता. पुढे पंचगगेनंही आक्राळ रूपधारण केलं होतं. कोल्हापूर शहरात जातानाच तावडे हॉटेलजवळ दोन्ही बाजूला पाणीच पाणी होतं. ऑफिसला आलो आणि कॅमेरा न काढता मोबाईलवरच कव्हरेज करण्याचा निर्णय सचिन आणि मी घेतला. आम्ही कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणची पुरस्थिती दाखवत होतो. रविवारी वाटतं होतं पाऊस थांबेल आणि आलेला पूरही ओसरेल. रात्री कोणताही धोका नको म्हणून ऑफिसमध्येच झोपलो. पावसाचा आवाज ऐकून रात्री चार-पाचवेळा जागा झालो.

बाहेर डोकावलं की धडकी भरायची. काही सुचेनासं झालं. पुन्हा दुसरया दिवशी पहाटेच सचिन आणि मी फील्डवर. ज्या शाहूपुरीत रविवारी रात्री गुडघाभर पाणी वाहत होतं तिथं कमरेएवढ पाणी झालं होतं अनेक दुकान पाण्याखाली गेली होती. सकाळी सकाळी महापालीकेचे कर्मचारी लोकांना स्थलांतरित करत होते. साधनसामुग्री कमी होती. तरूणांना हात धरून बाहेर काढत होते तर ज्येष्ठांना  ट्युबवर बसवून बाहेर काढले जात होते. जिथं पाणी वाढेल तिथले लोक सैरभैर होत होते. पाऊस कुणालाच काही सुचून देत नव्हता. पाण्याची पातळी वाढत होती,तरीही 2005 चा पूर ज्यांनी बघितला होता त्यांना याच गांभीर्य नव्हतं.


 

सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले. जो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दहा मिनिटं थांबत नव्हता तोही बंद झाला. सोमवारी रात्रीही पावसाचा जोर वाढला होता. पावसाच्या आवाजाने थरकाप उडत होता. दुसरया दिवशी पासून जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी या त्रिकुटाने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळण्यास सुरूवात केली. लोकांची अवस्था वाईट होती. वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित करण्यात येत होतं. आम्ही महावीर काॅलेजच्या बाजूने एका बोटीतून आत गेलो. आत स्मशानशांतता होती. एखाद्या आपार्टमेंटमधून आवाज यायचा 'वाचवा वाचवा' 


आवाज ऐकून अंगावर काटा यायचा. दररोज पावसाचा वाढता जोर आणि वाढलेलं पाणी यामुळे सगळं वातावरण थक्क करणारं होतं. लोकांचे भेदरलेले चेहरे पहावत नव्हते. त्याच दरम्यान एनडीआरफच्या बोटीतून प्रयाग चिखली, आंबेवाडी गावाच्या दिशेने गेलो. वीजेच्या खांबावरील विद्युत वाहक तारासुध्दा पाण्यात होत्या तर जी होर्डींग्स पाहण्यासाठी मान वर करावी लागायचे त्या होर्डींग्सला पाणी लावलेलं.

रस्त्याकडेची सगळी घरे, दुकाने पाण्याखाली गेली होती. काही घरांवर लोक होते ते बाहेर काढा म्हणून हाका मारत होते. काही ठिकाणी जनावरं इमारतीवर नेली असल्याचं चित्र होतं. ज्या पंचगगेला भाग्यलक्ष्मी मानलं जायचं तिनंच सगळं उध्दवस्त केल होतं. आठ दिवस हा थरार सुरू होता. प्रशासनाचा संघर्ष आणि दैव कृपेने कोणतीही जिवितहानी झाली नाही. कोल्हापूरकरांनी दातृत्वाचा आदर्श जगापुढे घालून दिला. सर्वच नेते मंडळी लोकांच्या मदतीसाठी झटली. आठ दिवसांनंतर सुटकेचा निश्वास सोडला. सगळं सुरळीत झालं पण वाटायला लागलं यापेक्षा मोठं संकट असूच शकत नाही आणि येऊही नये. आज हे लिहतानाही ते आठ -दहा दिवस तसेच डोळ्यासमोर उभे राहताहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com