धनंजय महाडिक राष्ट्रवादीला रामराम ठोकणार ? कोल्हापुरातही राष्ट्रवादीला दणका

धनंजय महाडिक राष्ट्रवादीला रामराम ठोकणार ? कोल्हापुरातही राष्ट्रवादीला दणका

कोल्हापूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना वावटळात दिवा लावून राष्ट्रवादीची शान राखलेले माजी खासदार धनंजय महाडिक हेही राष्ट्रवादीला रामराम करण्याची शक्‍यता आहे. पुढील महिन्यात त्यांचा भाजप प्रवेश असल्याचे समजते. तथापि भाजपत त्यांना घेतल्यानंतर कोणती जबाबदारी किंवा पद द्यायचे यावर निर्णय होत नाही, त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबल्याचे बोलले जाते. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील पक्षांतील दिग्गजांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीतही अस्वस्थता पसरली आहे. कोल्हापुरातील माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदिंकडूनही भाजपा प्रवेशाची चाचपणी सुरू असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. गेल्या आठवडाभरात राज्य पातळीवरील राष्ट्रवादीच्या डझनभर आमदार व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

त्यात महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, माजी मंत्री सचिन अहिर आदिंचा समावेश आहे. याशिवाय नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अजूनही काही आमदार, पक्षाचे पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीलाच राज्यात मोठे खिंडार पडले आहे. त्याचे लोण कोल्हापुरात पोहचण्याची शक्‍यता दिसू लागली आहे.

राधानगरीत उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील या मेव्हण्या पाहुण्यातच चढाओढ सुरू आहे. पक्ष नेतृत्त्वाचा कल के. पी. यांच्या बाजूने असल्याने ए. वाय. हे केव्हाही भाजपात प्रवेश करू शकतील अशी स्थिती आहे. भाजपाचे इचलकरंजी आमदार सुरेश हाळवणकर हे ए. वाय. यांचे व्याही आहेत, त्या माध्यमातून ते भाजपात जाऊ शकतात असे समजते. राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखतीला उपस्थिती लावलेल्या आमदार संध्यादेवी कुपेकर ह्या स्वतः लढण्याची शक्‍यता नाही, तथापि त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या सौ. नंदिती बाभूळकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली असतानाच त्यांचेही पाय भाजपाकडे वळू लागले आहेत. 

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही समाविष्ट होण्याची शक्‍यता आहे, तसे झाले तर शिरोळची जागा ही स्वाभिमानीला सोडावी लागणार आहे. त्यामुळे या मतदार संघातून तयारी केलेले राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादीतील या घडामोडीमुळे पक्षासोबत असलेल्या कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता आहे. भाजपाची ऑफर नाकारून राष्ट्रवादीचा बाणा जपलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्यामुळे कागल तालुक्‍यात कार्यकर्त्यांत चैतन्य असले तरी जिल्ह्याच्या इतर मतदार संघात मात्र अगोदरच कुमकवत असलेल्या राष्ट्रवादीत संभाव्य पक्षांतरामुळे चलबिचल सुरू आहे. 

Web Title: NCP leader Dhananjay Mahadik may be enters BJP
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com