'पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान काय आखाडा खणायला येतात काय?’ अमोल कोल्हेंचा सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला.

कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला.

परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे मतदार ऋतुराज पाटील यांच्या मागे राहतील, हे आजच्या गर्दीवरून दिसते. ही सभा म्हणजे त्यांच्या विजयाची नांदी आहे. भाजपचे दिवाळं काढल्याशिवाय दिवाळी करायची नाही. जिथे जिथे ‘हात’, ‘घड्याळ’ दिसेल त्यासमोरील बटन दाबून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दहा वाजण्यास केवळ दहा मिनिटे असताना संभाजीनगरातील व्यासपीठावर येतानाच खासदार कोल्हे यांनी पालकमंत्र्यांचा समाचार घेतला. महिला गर्भवती असताना तिची प्रसूती करण्यासाठी डॉक्‍टरांचे काम त्यांनी शिल्लकच ठेवले नाही, असे सांगून रस्त्यांतील खड्ड्यांची समस्या मांडून त्यांनी ‘आरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा आवाज दिला. यावेळी एकच जल्लोष झाला.

खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘पूर्वी शाळेत पोरगं नापास झालं की गुरुजी सांगत होते, जा बापाला घेऊन ये. आता महाराष्ट्रात असेच घडलंय. मुख्यमंत्री विकासाच्या कामात नापास झाल्यामुळेच आज पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा होत आहेत, तरीही आमचे मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीसाठी समोर पैलवानच दिसत नाही. मग हे सगळे काय आखाडा खणायला येतात काय?’’

कोल्हे म्हणाले, ‘‘३७० कलम प्रचारात येत आहे. सहामाही परीक्षेत पास झाले म्हणून त्याच अभ्यासक्रमावर वार्षिक परीक्षेत पास होता येणार नाही. त्याचप्रमाणे देशाचे, काश्‍मीरचे प्रश्‍न महाराष्ट्रात चालणार नाहीत. ऋतुराज पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.’’

तत्पूर्वी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सांगितले, पंतप्रधान मोदी, मंत्री अमित शहा गुन्हेगार आहेत. गुन्हे लपवण्यासाठी ते यंत्रणा विकत घेतात. मुख्यमंत्र्यांवरही बलात्काराचा, खुनाचा गुन्हा आहे. हे सत्तेत आल्यावर त्यांनी हे गुन्हे काढून घेण्याचे काम केले. ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?
१६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याबद्दल शेतकरी मुख्यमंत्र्यांना विचारू लागला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘भारत माता की जय’ म्हणायला लावले. मुख्यमंत्री महोदय, शेतकरी तुमची थट्टा करत नव्हता. त्याच्यात वादळ होते, कच्च्या बच्च्यांची चिंता होती, शेतीची चिंता होती. आरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असे कोल्हे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तत्पूर्वी, उमेदवार ऋतुराज पाटील, प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांसह नेत्यांची भाषणे झाली.

Web Title: Vidhan Sabha 2019 Dr Amol Kolhe comment in Kolhapur


संबंधित बातम्या

Saam TV Live