घोरपडे ते केतकर; राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रवास 

घोरपडे ते केतकर; राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रवास 

काँग्रेसने राज्यसभेसाठी कुमार केतकरांची उमेदवारी काल जाहीर केली आणि माझं मन का कुणास ठाऊक पण 1989 च्या काळात गेलं. पुण्यातून ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपडे यांना काॅग्रेसनं लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशी तेव्हा अनेक सामाजिक राजकीय संस्थांची, संघटनांची इच्छा होती. विविध धर्मीय नेत्यांनी, पुण्यातील मुख्य गणेशोत्सव मंडळांचा, त्यांना पाठिंबाहि दिला होता. पुण्याच्या राजकारणात त्यावेळी गाडगीळ गट आणि टिळक गट जोरात होते. महापालिकेत, विधान मंडळाच्या आणि संसदेच्या पदांच्या वाटपात कायम या गटांचं आळीपाळीनं वर्चस्व आणि रस्सीखेच होत असे. त्यामुळे घोरपडेंच्या उमेदवारीची चर्चा आणि कल्पना त्या दोघा नेत्यांना मान्य व सहन होणे शक्य नव्हते. वास्तविक राजकारण समाजकारणाचा वारसा 1953 आणि 1958 मधे आमदार असलेल्या वडील बाबासाहेब घोरपडेंकडून चंद्रकात घोरपडेंकडे आलेला. आपल्या धारदार लेखणीनं, अत्यंत कुशाग्र बुद्धीनं आणि चतुरस्त्र व्यासंग वृत्तीनं त्यांनी केसरीच्या संपादक पदावरून आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांचे तळपते अग्रलेख जनसामान्यांना आकर्षित करीत आणि राजकारण्यांचे त्यामुळे धाबे दणाणत असे. वसंतदादा पाटलांनी याचवेळी त्यांच्यासाठी राजीव गांधींकडे पुण्याच्या लोकसभा तिकीटाची मागणी लावून धरली होती. पण ऐनवेळी तिकिटं जाहीर होण्याआधी पुण्यातल्या आणि प्रदेश काँग्रेसच्या काही जणांनी पक्षश्रेष्ठीच्या कानात सांगितल्याचं बोललं गेलं, की घोरपडे खरे तर आतून पवार गटाचेच आहेत !झालं ! एका रात्रीत पारडं फिरलं, आणि घोरपडेंना डावलून गाडगीळांची उमेदवारी जाहीर केली गेली. 

आज प्रकर्षानं जाणवतं, की त्या काळात चंद्रकांत घोरपडेंवर काॅग्रेसनं आणि त्यापेक्षा नियतीनं खूप अन्याय केला. एका अत्यंत बुद्धीमान, निर्भीड आणि व्यासंगी पत्रकार संपादकाची संसदेत जाण्याची संधी हुकली. नंतर संपादकपदी गेलेल्या,पण केसरीत पूर्वी घोरपडेंचा अनेकदा संपादकीय मार खाल्लेल्या पत्रकारांनी त्यांच्या नावांनी बोटं मोडली, पण खाजगीत कायमच त्यांचं मोठेपण मान्य केलं. माध्यमांचं स्वातंत्र्य आणि खरी आक्रमक पत्रकारिता ते स्वतः कायम जगले आणि सहकारयांना तीच शिकवली. इतर माध्यमांची गर्दी नसलेल्या त्या काळात फक्त तीन वर्ष त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळालेल्या मला ते कायम रोल माॅडेल वाटत. नंतर मागच्या 28 वर्षात अनेक वाहिन्यांवर काम करताना घोरपडेंची संपादकीय शिकवण कायमच आठवत असे. 

नंतरच्या काळात फार लवकर अकाली ते गेले. त्याच काळात विदयाधर गोखले, नारायण आठवले यांच्या सारखे अनेक, नव्हे सर्वात जास्त मराठी पत्रकार संपादक, बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभेवर पाठवले. त्यांच्यापैकी कोणी किती व काय योगदान दिले, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. पण घोरपडेंच्या काँग्रेसी विचारात कधी फरक पडला नाही. ते गटातटांच्या पलिकडे होते. त्यांच्या लेखणीने उजव्यांवर व काॅग्रेसवर सुदधा आसूड ओढले. पण त्यांच्या कुशाग्र बुदधीमत्तेची, प्रगल्भ अनुभवाची आणि पात्रतेची कदर झाली नाही याची खंत वाटते. एका बुद्धीमान संधी नाकारलेल्या संपादकाला नंतरच्या काळात आपल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात न पाठवणे हा काॅग्रेसचा त्या काळातला करंटेपणा ठरला. क्रूर नियतीने त्यांना तशी संधीच दिली नाही. वयाच्या साठीच्या आसपासच ते गेले. 
आज केवळ वैधानिक किंवा संसदीय वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी फिल्डींग लाऊन कोणत्याहि थरापर्यंत चापलुसी करण्याच्या काळात, घोरपडे किंवा केतकर ठळक अपवाद ठरतात ते त्यांच्या अव्यभिचारी निष्ठा, वादातीत कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम वक्तृत्व, प्रदीर्घ अनुभव, राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय भान, अफाट स्मरणशक्ती आणि व्यासंगामुळेच. अशा बुद्धीवंतांना त्यांच्या अंताआधी संधी मिळणे फार महत्वाचे ! अशा लोकप्रतिनिधींमुळे संसदीय कामकाज समृद्ध होते आणि पर्यायाने आपली लोकशाही सुद्धा! कुमार केतकरांचे अभिनंदन !

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com