पक्ष सोडलेल्या नेत्यांची व्यथा... मोठी संधी घालवली

सरकारनामा
रविवार, 5 जानेवारी 2020

पुणे : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. काही जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. मात्र ज्यांनी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी कष्ट उपसले, पक्ष वाढवला त्यांनी भाजपचा रस्ता धरल्याने अशा काही वजनदार नेत्यांची मंत्रिपदाची संधी पुन्हा हुकली. थोडा धीर धरला असता तर...! वेगळे चित्र पाहण्यास मिळाले असते का ? 

पुणे : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. काही जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. मात्र ज्यांनी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीसाठी कष्ट उपसले, पक्ष वाढवला त्यांनी भाजपचा रस्ता धरल्याने अशा काही वजनदार नेत्यांची मंत्रिपदाची संधी पुन्हा हुकली. थोडा धीर धरला असता तर...! वेगळे चित्र पाहण्यास मिळाले असते का ? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे कालरात्री मंजुरीसाठी पाठवली होती. तिला मंजुरी देण्यात आली. गेल्या महिन्याभर चाललेल्या घोळानंतर आज खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. तिन्ही पक्षात खातेवाटपावरून नाराजी होती. ती आता दूर झाली. त्यामुळे उद्यापासून प्रत्येक खात्याचा कारभार सुरू राहील आणि कॅप्टन अर्थात उद्धव ठाकरेंचा सर्वांवर वॉच असेल. 

आजचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येत असताना थोडे दु:ख वाटले ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून गेलेल्या वजनदार नेत्यांचे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीचे राज्यातील जे चर्चेतील चेहरे होते. ज्यांनी पक्षाला रामराम केला होता. त्यांना असे वाटले होते की पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता कदापी येणार नाही. ते शक्‍य नाही. खरेतर झालेही तसेच. जनादेश होता तो मुळी भाजप-शिवसेनेला. घडले मात्र वेगळेच. 

शिवसेनेने 2014 चे उट्टे काढले. मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून भाजपलाही धडा शिकविला. आज भाजपची मंडळी कितीही ओरडून सांगत असली की शिवसेनेने जनादेशाचा अपमान, विश्वासघात केला. हे आरोप शिवसेनेला पटत नाही. कारण 2014 मध्ये भाजपने युती तोडली नसती तर कदाचित शिवसेनेचा त्यावेळीच मुख्यमंत्री बनला असता. मोदी लाटेत भाजपला स्वबळावर सत्ता आणायची होती. पण, ती काही आली नाही. 

2019 ला युतीचीच सत्ता आली. शिवसेनेने मात्र दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून भाजपला कात्रजचा घाट दाखविला. त्यामुळे ज्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून कमळ हातात घेतले होते. मंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते भंगले. 

"राष्ट्रवादी'चे गणेश नाईक, शिवेंद्रराजे, भास्करशेठ जाधव, वैभव पिचड, दिलीप सोपल, कॉंग्रेसचे हर्षवर्धन पाटील हे पक्षात होते. ते जर आज पक्षात असते तर पक्षाला त्यांचा विचार करावाच लागला असता. आज जे बाळासाहेब पाटील मंत्री होतात. त्यांच्याऐवजी शिवेंद्रराजे मंत्री बनले असते. गणेश नाईक, वैभव पिचडांनाही संधी मिळू शकली असती. 

भास्करशेठ हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले. ते प्रदेशाध्यक्षही बनले. ते जर आज राष्ट्रवादीत असते तर तेही मंत्री बनले असते. आज ते सत्ताधारी शिवसेनेत आहेत. आमदार आहेत. पण, त्यांना यावेळी मंत्री करणेही अवघड होते. कारण त्यांनी राष्ट्रवादी सोडली. शिवसेनेत गेले. यापूर्वी ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आले होते. म्हणजे ते आयारा-गयारामच. 

मधुकर पिचड, अभयसिंहराजे भोसले हे श्री. पवारांचे समकालीन आणि कट्टर समर्थक. आयुष्य त्यांच्यासोबत गेलेले. त्यांच्या मुलांनीही वैभव, शिवेंद्रराजे यांनी तसेच दिलीप सोपलांनीही पक्ष सोडायला नको होता असे आजही त्यांच्याविषयी बोलले जाते. गणेश नाईक, भास्करशेठ हे कधी राष्ट्रवादीचे नव्हते. ते सोडून गेले त्यात आश्‍चर्य वाटण्याचे काही कारण नाही. 

हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेसचे वजनदार नेते होते. त्यांच्या शब्दालाही पक्षात किंमत होती. थेट राहुल गांधींबरोबर संपर्क होता. यावेळी त्यांचाही विचार झालाच असता. त्यांनीही कॉंग्रेसमध्ये थांबायला हवे होते. त्यांनी पक्ष सोडू नये असे त्यावेळी अनेक दिग्गजांना आणि त्यांच्या चाहत्यांचीही होती. 

ही सर्व मंडळी पक्षात असती तर आणखी जागाही वाढल्या असत्या आणि कदाचित चित्र वेगळे दिसले असते. पण, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी चमत्कार करून दाखविला. भाजपला धोबीपछाड दिला. सत्तांतर घडवून आणले. ज्या पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळाल्या. तो पक्ष विरोधी बाकावर आहे. शिवसेनेमुळे हातातोंडाशी आलेला घास गेला. ज्यांना कमी जागा मिळाल्या ते तीन पक्ष एकत्र येऊन सत्तेवर आले आणि हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live