प्रिय मुंबई, हाय, मला ओळखलंस का? 

सिद्धेश सावंत
बुधवार, 4 जुलै 2018

प्रिय मुंबई,

प्रिय मुंबई,

                हाय, मला ओळखलंस का? मी तुझा बॉयफ्रेन्ड.. सॉरी एक्स बॉयफ्रेन्ड. हा म्हणजे आपला ब्रेकअप होऊन आता बराच वेळ झाला. त्यानंतर तुझे अनेक प्रियकर होऊन गेले असतील, किंवा अजूनही असतील. पण कालपरवापर्यंत मला तुझ्याबद्दल जे प्रिय वालं फिलींग होतं, ते आता अजिबात राहिलेलं नाही. यापुढे तुला प्रिय म्हणावं का, हाच खरा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत तू फार बदललीस. हिरोईनने एखाद्या गाण्यात पटापट चार ड्रेस बदलावेत, तसा हा बदल आहे. आता हिरोईनने एकाच गाण्यात चारवेळा कपडे का बददले, हा प्रश्न जसा कुणी तुला विचारला नव्हता, तसंच तुलाही कुणी तू का बदललीस म्हणून विचारलं नाही, आणि विचारणारदेखील नाही. एनीवे.

    आज अंधेरीला पूल पडला. अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कधी ना कधी पडणारच होता, हे माहितच होतं लोकांना. उद्याचं मरण आजवर आलं, एवढंच. तुला माहितीये का, लोकांना कळलंय, की तू खचत चाललीएस. वडाळ्यात खचलीस. त्यानंतर काल परवाच काळाचौकीलाही खचलीस. डिप्रेशनमध्ये असं सगळं होतंच. स्वाभाविकच आहे. काही गोष्टी नैसर्गिकच असतात, त्याला तू काय किंवा मी काय, कुणीच काही करु शकत नाही. नैराश्यात फक्त मोटीवेटींग आणि इन्स्पिरेशल कोट वाचून उभारी मिळत नाही हेच खरं. प्लास्टिकबंदीनं आनंदी झालेला तुझा चेहरा पाहिला होता, पण हे हसू फार काळ तुझ्या चेहऱ्यावर टिकणार नाही, याची पुसटशी कल्पना होतीच. झालंही तेच.

    आपली प्रियसी खचतेय, हे प्रियकराला कळत असतं. मलाही कळतंय गं… पण करणार काय? माझ्यापेक्षा बाकीचे सगळे खूप प्रेम करतात गं तुझ्यावर. तू त्यांना भरभरून देतेस. आपलंसं करुन टाकतेस. कोण कुठून आलाय, कसाय, याचा कसलाही विचार न करता तू त्यांना सर्वस्व देऊन मोकळी होतेस. निस्वार्थ प्रेम केलं की काय होतं, हे आज तू दाखवून दिलंस. उद्ध्वस्त होण्यासाठी स्वतःची राखच झाली पाहिजे, असं काही गरजेचं नसतं गं. कधी कधी आपण स्वतःला इतकं पोखरुन घेतो, की उद्ध्वस्त होण्याची वेगळी गरजच उरत नाही. तुझंही तेच होतंय, किंबहुना झालंय.

    खरं सांगू का, तुझ्यासोबत असलेलं नातं इतके दिवस केवळ पैशांसाठी टिकून होतं.. आता ती गरज संपली म्हणून आपलं नातंही संपलं. खरंतर म्हणूनच तूला आता आय लव्ह यू म्हणायचीही गिल्ट वाटतेय.. 

    तुला आठवतंय का? तुझा तो अथांग समुद्र, जुन्या वास्तू, तुझं स्पिरीट यावर मी कितीक कविता, गझला आणि गुणगान गायले असतील. पण आता जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा हे सगळं मीच तुझ्यासाठी लिहीलं होतं का, अशी माझीच मला शंका येते. तू आता खूप बदलीएस. आणि एकदा का बदल खुपला, की विश्वास संपतोच. माझाही तुझ्यावरचा विश्वास उडालेलाय. तू आता कोणत्याही क्षणी घात करु शकतेस. मला माहितीये हे खूपच रूडली बोलणं आहे. पण हो, तुला हे ऐकावंच लागेल. 

    तू कोणत्याही क्षणी मला मॅनहोलमध्ये पाडून मारु शकतेस. रस्त्यावरुन जाताना विमान माझ्या अंगावर पाडायलाही तू कमी करणार नाहीस. किंवा मग चेंगराचेंगरीमध्ये गुदमरुन माझा श्वास कायमचा कसा बंद पाडायचा, हे ही तुला कळलेलंच आहे. झाडाखाली उभा राहिलो सावलीत, तर फांदी पाडून मारायलाही तू मागेपुढे पाहणार नाहीस. तू  कोणत्याही थराला जाऊ शकतेस हे मला कळून चुकलंय. खरंच आता तुझ्यावर कुणी प्रेम करावं का, हा ही प्रश्न आहेच. मला माहितीये तुला हे ऐकून वाईट वाटेल, दुःख होईल. पण यापुढे मला तरी तुझ्यावर विश्वास ठेवणं कठीणए.

    मला मान्य आहे की चूक फक्त तुझ्या एकटीचीच नाहीये. तूला पूर्णपणे दोष देऊन मी माझ्या चुकांकडे कानाडोळा करतोय, असं अजिबात नाही. मी तुझ्यावर प्रेम केलं ही देखील माझी चूकच होती, हे देखील आता स्वीकारायलाच हवं. एका स्वार्थासाठी फक्त तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, हे तू अजूनही का ओळखू शकली नाहीस? मी ही त्याच स्वार्थी लोकांपैकी एक होतो, हे मला आज कळतंय. चांगल्या सवयींची तारिफ करताना तुझ्या वाईट सवई वेळीच मी थांबवल्या नाहीत, हे चुकलंच माझं. तुझं चुकतंय, हे तुला सांगितलं नाही, हा माझा गुन्हाच होता. ज्या गुन्ह्याची माफी मागणही आता माझ्या हातात नाही. तरीही जमलं तर मला माफ कर. रियली सॉरी.

    तुझी काळजी तू घेशीलच. खात्री आहे. तुझ्या ढसा-ढसा रडण्यानं सखल भाग गलबलून जातात. चारचाकी वाहनांना तू लगेच कवेत घेतेस. मेट्रो काय किंवा मोनो काय, जागा मिळेल तिथून तुझ्यावर उभा आडवा पाशवी बलात्कार केला जातो, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. पण करणार काय? रोजची शिफ्ट आणि आठवड्याचा विक ऑफ या सगळ्यांत तूला वेळ देणं राहूनच गेलं. आणि शेवटी नातं टिकवायचं असेल, तर वेळ द्यावा लागतो, असं तू जे म्हणायचीस, ते अखेरपर्यंत मला जमलंच नाही गं.

    तुला आठवत असेल, एल्फिन्स्टनमधल्या चेंगराचेंगरीला वर्षही झालं नाहीये. २९ ऑगस्टच्या पावसाचीही वर्षपूर्ती अजून व्हायचीए. जुलै आता कुठे सुरु झालाय. २६ तारीख बघता-बघता जवळ येईल. ११ जुलैला तुझी काढण्यात आलेली छेड मी अजूनही विसरलेलो नाहीये. शेतकऱ्यांनी संप पुकारला, तेव्हाही तू ठप्प झालीस. रेल्वे एप्रेन्टिसवाल्यांनी तुला धारेवर धरलं, तेव्हाही तू कोलमडलीस. आठवड्याभरापूर्वी मुसळधार पाऊस झाला, तेव्हाही तू रडकुंडीला आली होतीस. या सगळ्यांमध्ये तू गळा काढून रडलीस. पण तुझे डोळे पुसायला कुणीच आलं नाही. मी ही नाही. 

    पण ऐक. हे आणि यासारखं बरंच काही भविष्यात अनेक वेळा होत राहील. हे माझ्याच्याने बघवणार नाहीच. आता तर तूझा हात धरून 'पुढे जाऊ नकोस गं, पुढे आणखीनच बिकट परिस्थिती होणार आहे, इथेच थांबव स्वतःला', असं म्हणत तुला थांबवण्याचं धाडसही होत नाही. कारण तुझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. माझी नाही घेतलीस, पण तू त्यांची काळजी घे. त्यांना माहिती आहे, तू त्यांना सांभाळून घेशील, म्हणून ते तुझ्यापाशी आलेत. त्यांचा विश्वासघात करु नकोस. 

 

   जाता-जाता एकच सांगेन, दुसऱ्यांची काळजी घेता घेता, थोडं लक्ष स्वताच्याही तब्बेतीकडे दे. तुझ्याच्याने आता फार दगदग होणार नाहीए. उगाच म्हाताऱ्या लहान पोरांसारखा हट्ट करु नकोस. सांभाळ स्वतःला. आता जे काही भलंबुरं होईल, त्याला जबाबदार तू स्वताच असशील, एवढं लक्षात ठेव.

 

 तुझा आणि तुझाच,
 एक्स मुंबईकर

-सिद्धेश सावंत
 


संबंधित बातम्या

Saam TV Live