Loksabha 2019 : मोदी-फडणवीस-उद्धव विरुद्ध राज-पवार असा सामना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि राज ठाकरे असा सामना रंगल्याचे चित्र आहे. हे चित्र राज्यातील सर्व टप्प्यांतील मतदान पार पडेपर्यंत कायम राहणार असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि राज ठाकरे असा सामना रंगल्याचे चित्र आहे. हे चित्र राज्यातील सर्व टप्प्यांतील मतदान पार पडेपर्यंत कायम राहणार असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्यापासून मोदी यांनी आतापर्यंत राज्यात पाच सभा घेतल्या आहेत. त्यांच्या जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत मतदान पार पडले असून, दुसऱ्या टप्प्याच्या दहा जागांसाठीचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भात मुक्‍काम ठोकला आहे. उद्धव ठाकरे मुंबईतून सभांसाठी रवाना होत आहेत. 

एका बाजूला सत्ताधारी पक्षांनी प्रचाराची धार वाढविली असताना, कॉंग्रेस आघाडीकडून एकटे शरद पवार किल्ला लढवत आहेत. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उमेदवार असल्यामुळे नांदेडमध्ये अडकून पडले असताना, पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये मुक्‍कामाला आहेत. एकटे शरद पवार पश्‍चिम महाराष्ट्रापासून विदर्भ आणि आता मराठवाड्यात प्रचार सभा घेत आहेत. दररोज तीन ते चार सभा घेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर पवार यांनी भर दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही भाजपचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे बाहेर पडले आहेत. मुंबईतील गुढीपाडावा मेळाव्यात राज यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करीत पुराव्यानिशी मोदी सरकारवर तोफ डागण्यास सुरुवात केल्यापासून त्यांच्या भाषणावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज यांची भाषणे कमालीची यशस्वी होत असल्याने भाजपच्या टीकेचा रोख कॉंग्रेस आघाडीऐवजी राज ठाकरे यांच्याकडे वळला आहे. राज ठाकरे यांच्या सहा सभा जाहीर झाल्या असून, आणखी सभा होणार आहेत. त्यांच्या सभांची मागणी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांकडून होत असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे दररोज पत्रकार परिषदा घेत राज यांच्यावर टीका करीत आहेत. 

फडणवीस यांनीही राज यांच्यावर टीकास्त्र सोडण्याचा धडाका लावला आहे. म्हणजेच राजकीय प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार व राज ठाकरे असा सामना रंगल्याचे सध्याचे चित्र आहे.

Web Title:  Marathi News Loksabha Election 2019 Narendra Devendra Uddhav Raj Sharad Pawar Politics


संबंधित बातम्या

Saam TV Live