लॉकडाऊनमध्ये वीज बिलांद्वारे ग्राहकांची लूट, कारवाई कधी होणार?

साम टीव्ही
बुधवार, 29 जुलै 2020

 

  • लॉकडाऊनमध्ये वीज बिलांद्वारे ग्राहकांची लूट 
  • वीज वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना शॉकवर शॉक
  • ऊर्जामंत्री नितीन राऊत कारवाई कधी करणार?

लॉकडाऊननंतर अव्वाच्या सव्वा वीजबिलं येतायंत. आता लॉकडाऊन संपलं तरीही ग्राहकांना भरमसाठ विजबिलं येतायंत. त्यामुळे वीज वितरण कंपन्यांसह ऊर्जामंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी आहे. 

आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीनं शॉक दिलाय. लॉकडाऊन काळात आणि आता लॉकडाऊन संपल्यानंतरही आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे नागरिक हैराण आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी अशा वीज कंपन्यांनी ग्राहकांची विजबिलं कमी केलीच नाहीत, उलट वाढवलीयेत. वीज वितरण कंपन्या स्वत:चं तिजोरी भरण्याचं काम करत असल्यानं नागरिक संतप्त झालेत.

ही आहे नवी मुंबईतील अनमोल प्लॅनेट सोसायटी. या सोसायटीतील नागरिकांना लॉकडाऊनपूर्वी तीन महिन्यांचं विजबिल ६ ते ९ हजार रुपये यायचं. मात्र आता प्रत्येक नागरिकाला ३ महिन्यांसाठी ३० ते ४० हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलंय. ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी अनेकदा वीजबिलं कमी करण्यासंबंधी आणि दोषींवर कारवाई कऱण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र तेही हवेतच विरल्यानं संतापाची लाट उसळलीय. 

फक्त सर्वसामान्य नाही तर बॉलीवूड कलाकार, नामवंत क्रिकेटपटूंसह अनेक बड्या असामीही वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक घडी विसकटलीय. दुसरीकडे ही भरमसाठी वीज बिलं. हे कमी म्हणून की काय. ऊर्जामंत्र्यांची कारवाईची आश्वासनंही हवेतच विरतायंत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याप्रश्नी तातडीनं लक्ष घालण्याची मागणी होतेय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live