VIDEO | कोण आहेत लष्कर प्रमुख मनोज नरवणे?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 डिसेंबर 2019

महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा.. देशाच्या लष्करप्रमुख पदाची धुरा आता महाराष्ट्राचा सुपुत्र सांभाळणार आहे... कोण आहेत ते आणि काय आहे त्यांची किर्ती? पाहूयात त्यांच्याबद्दल हे संपूर्ण विश्लेषण...

महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा.. देशाच्या लष्करप्रमुख पदाची धुरा आता महाराष्ट्राचा सुपुत्र सांभाळणार आहे... कोण आहेत ते आणि काय आहे त्यांची किर्ती? पाहूयात त्यांच्याबद्दल हे संपूर्ण विश्लेषण...

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग, अशा परिस्थितीतून सध्या भारतीय लष्कराची वाटचाल सुरू आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेले छुपे युद्ध, चीनकडून वरचेवर काढल्या जाणाऱ्या कुरापती, हिंदी महासागरातील वाढती स्पर्धा, जम्मू-काश्‍मीरमधील अस्वस्थता, तसेच एकुणातच संरक्षणसज्जतेसाठी लष्कराच्या आधुनिकीकरणाची गरज, या पार्श्‍वभूमीवर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे लष्कराची धुरा येत आहे. ते ती उत्तमपणे बजावतील, यात शंका नाही.

पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’त शालेय शिक्षण झालेल्या नरवणे यांनी खडकवासल्याच्या ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’तून लष्करात प्रवेश केला. त्यांनी संरक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी, तसेच एम. फिल. पदवी मिळविली आहे. त्यांचे वडील हवाई दलातील निवृत्त अधिकारी असून, आकाशवाणीवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सुधा नरवणे या त्यांच्या आई आहेत. नरवणेंनी लष्करी सेवेत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या असल्याने लष्करप्रमुखपदासाठी झालेली त्यांची निवड यथार्थ म्हणावी लागेल. जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद, ईशान्य भारतातील घुसखोरी, फुटीरतावादी कारवाया अशा अनेक प्रश्‍नांच्या संदर्भात नरवणे यांनी अनुभव घेतला आहे. यांपासून ते श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यापर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये नरवणे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेत विविध पदकांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. 

ईशान्य भारतात चीनकडून असलेले छुपे आव्हान सतत डोके वर काढत असते, अशा पूर्व विभागाचे नेतृत्व नरवणे यांनी केले आहे. त्यानंतर ते लष्कराचे उपप्रमुख झाले. पाकिस्तानकडून सातत्याने होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, सीमपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद्यांच्या कारवाया, यामुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांपुढे मोठे आव्हान आहे. भारतीय उपखंडात वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या चीनच्या कारवायांविषयी सदैव दक्ष राहण्याची गरज आहे. लष्कराचे आधुनिकीकरण केल्याशिवाय या आव्हानांना तोंड देणे सोपे नाही. त्यासाठी नरवणेंना अग्रक्रमाने ठोस पावले उचलावी लागणार आहेत. लष्करात गेल्यानंतर प्रांत, भाषा, जात, धर्म हे निकष बाद ठरतात, हे खरेच आणि ते योग्यही आहे. तरीही, या नियुक्तीचा मराठी माणसाला विशेष अभिमान वाटेल, हे मात्र खरे. याचे कारण या महाराष्ट्रभूमीला लाभलेली शौर्याची परंपरा. 

Web Title: Lt Gen manoj naravane indian army chief

 


संबंधित बातम्या

Saam TV Live