महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी! एकट्या मुंबईत 17 जणांचे मृत्यू, तिसऱ्या टप्प्यावर जाण्याची शक्यता

साम टीव्ही
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोरोनानं राज्यात 22 जणांचा बळी घेतलाय. एकट्या मुंबईत कोरोनाची लागण झाल्यामुळं तब्बल 17 जणांचा मृत्यू झालाय.

भारतात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढतच चाललाय. त्याहूनही भयंकर म्हणजे महाराष्ट्रात कोरोनानं प्रचंड प्रमाणात हाहाकार माजवलाय. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं राज्यात 22 जणांचा बळी घेतलाय. एकट्या मुंबईत कोरोनाची लागण झाल्यामुळं तब्बल 17 जणांचा मृत्यू झालाय. तर पुणे, बुलडाणा, पालघरमध्येही एक एक जण दगावला आहे. मृत्यू झालेले सर्व कोरोनाग्रस्तांचं वय हे 50 हुन अधिक असल्याचं समोर येतंय.

देशाची स्थिती गंभीर बनत चाललीय. वोळीच सावधान नाही झालो तर इतर देशांसारखा अनर्थ होईल. पाहा सध्याची भारतात कोरोनाबाबत काय परिस्थिती आहे...

तर आतापर्यंत राज्यात 423 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 42 जण कोरोनाला धूळ चारुन घरी परतले आहेत. कालच्या दिवसात कोरोना रुग्णांमध्ये 88 जणांची भर पडलीय. आतापर्यंत कोरोना संशयामुळं 648 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. शिवाय सध्या राज्यभरात 38 हजाराहुन अधिक लोक होम क्वारंटाईन आहेत.

काय आहे सध्याची परिस्थिती

एकूण   ४२३ त्यापैकी ४२  जणांना घरी सोडले तर   २० जणांचा मृत्यू    
राज्यात आज एकूण ६४८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.  आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० हजार ८७३  नमुन्यांपैकी १० हजार २८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८हजार२४४  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २१३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १०६२ व्यक्तींच्या यादीपैकी ८९० व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ५७६ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ४ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी २९२ टीम काम करत आहेत तर पुणे महानगरपालिका क्षेत्रात ३७३ टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपा मध्ये २१० टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अशा २३३२ टीम संपूर्ण राज्यात काम करत आहेत. 

त्यामुळे महाराष्ट्राची चिंता अधिकच वाढलीय. लवकरात लवकर जर कोरोनावर मात नाही करता आली, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे, एकट्या मुंबईत 17 जण दगावले आहेत. त्याातल्या त्यात मुंबईत राहणाऱ्यांची संख्याही भयंकर आहे. काही भागात तर लोक खूप जास्त दाटीवाटीने राहतात.


संबंधित बातम्या

Saam TV Live