महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी, शनिवारपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढती...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 एप्रिल 2020

राज्यातील नव्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच आज राज्यात कोरोनाबाधित ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४  रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. 

2 दिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत होती. मात्र शनिवारी ही संख्या अचानक वाढली. राज्यात आज तब्बल 328 रुग्णांची वाढ झाली. राज्याचा एकूण आकडा 3 हजार 648 झाला. यात सर्वाधिक 184 रुग्ण मुंबईत आढळले तर पुण्यात आज 78 रुग्णांची वाढ झाली. 

पाहा सविस्तर राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण -

देशातही कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार 378वर पोहोचलाय. गेल्या 24 तासांत देशात 991 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. तर 24 तासांत 43 जणांचा मृत्यू झालाय. देशात कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांचा आकडा 480वर पोहोचलायत तर 1 हजार 992 जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलीय.

राज्यात सध्या एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७, ४६८ नमुन्यांपैकी ६३, ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२,२९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे. (या पूर्वी ११ एप्रिलला कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे). आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईतील पाच, पुण्यातील चार, औरंगाबादमधील एकाचा आणि ठाण्यातील एकाचा समावेश आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत तर सहा रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live