महाराष्ट्र मोठ्या संकटात! दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी...

महाराष्ट्र मोठ्या संकटात! दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी...

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्गाच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.  देशाच्या तुलनेत जास्त सर्वाधिक बाधित आढळले. सायंकाळी सहापर्यंत राज्यात कोरोनाच्या १४७ रुग्णांची नोंद झाली. कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी आजही विविध भागात नागरिक रस्त्यावर आले होते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट घ्यावे लागले. 

देशात प्राणघातक कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत ७७५ वर पोचली. मागच्या २४ तासांत देशभरात ७५ नवे रुग्ण आढळल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय टेलीमेडिसिन मार्गदर्शिका जारी केली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा, अशी सूचना मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आगरवाल यांनी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यपालांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज संवाद साधला. नागरिकांना लॉकडाऊन पाळण्यासाठी आवाहन करा आणि त्याचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष द्या, अशा सूचना राष्ट्रपतींनी दिल्या. या संकटाच्या क्षणी स्वतःचे प्राण धोक्यात घालून कोरोना बाधितांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या सेवेचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. 

भाजपने आपल्या एक कोटी कार्यकर्त्यांमार्फत पाच कोटी गरिबांना जेवण देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गरिबांच्या जोडील सध्या राबणाऱ्‍या पोलिस कर्मचाऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट करून घेतले आहे. 

गोरगरिबांच्या पोटापाण्याची सोय करा...
कोरोनामुळे व्यापार व्यवसायाचा गाडा थांबल्यामुळे रोजीरोटीची भ्रांत पडलेल्या मजुरांचे तांडे तिसऱ्या दिवशीही दिल्लीच्या बाहेर जाताना दिसले. द्वारका येथून दिल्ली बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर मजूर उत्तर प्रदेश किंवा बिहार सारख्या राज्यांमधील आपल्या घरी चालत निघाल्याचे दृश्य दिसत होते. शहरांमधून बाहेर पडणारा हा गरिबांचा ओघ थांबावा व त्यांना शहरांमध्येच रोजीरोटीची व्यवस्था करून द्यावी, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com