महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या पावसाची खबरबात! पाहा कुठे, किती, कसा पाऊस

साम टीव्ही
गुरुवार, 16 जुलै 2020

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात ढगाळ वातावरण असतानाच पावसाने हजेरी लावली होती..आजदेखील सकाळ पासूनच पावसाची रिपरिप ठाणे शहरात सुरू आहे..मागील तीन तासात ठाणे शहरात 50 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. सखल भाग असणाऱ्या वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचलंय... पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी साचलेलच आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहे. प्रामुख्यानं पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप तर पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, गोरेगाव, बोरीवली, दहीसर या भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुबईसह कोकण किनारपट्टींवर आज मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मागील २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर, अद्यापही पावसाचा जोर कायमच आहे. पुढील सहा तास मुंबईतील विविध भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात ढगाळ वातावरण असतानाच पावसाने हजेरी लावली होती. आजदेखील सकाळ पासूनच पावसाची रिपरिप ठाणे शहरात सुरू आहे. मागील तीन तासात ठाणे शहरात 50 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. सखल भाग असणाऱ्या वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचलंय. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी साचलेलच आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर   तालुक्यातील मंगरूळ धरण ओव्हरफ्लो झालंय.  या मध्यम प्रकल्पासह गंगापुरी आणि अभोरा हे सातपुडा पर्वतातील प्रकल्प देखील पावसाने भरून ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मंगरूळ प्रकल्प दोन दिवसांपूर्वी पूर्ण भरून ओसंडून वाहू लागलाय. भोकरी नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगरूळ, पिंप्री, केऱ्हाळा,भोकरी, तामसवाडी, बोरखेडा, पुनखेडा आणि पातोंडी या गावांजवळून भोकरी नदीचे पाणी तापी नदीला मिळालंय. नदी खळाळून वाहू लागल्याने या सर्व गावांच्या परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातल्या बोरी इचोड आणि एकुर्ली भागात काल काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. गावालगतच्या नाल्याला पूर आल्यानं गावात पाणी शिरलं. तर मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरातल्या वडकी मार्गावर नाल्याला पूर आल्यानं या मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. सध्या पावसाने उसंत घेतल्याने परिस्थिती पूर्ववत आलीय.

दरम्यान, काल राञी झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदिला पुर आला. पुरामुळे जळगाव - नांदुरा मार्गा वरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे, जामोद तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता. मात्र आज सकाळी पावसाने उघडीप घेतल्याने, पूर ओसरला. नांदुरा ते जळगाव जामोदला जोडणारा हा एकमेव ब्रिटिशकालीन पूल आहे. जो सध्या जीर्णावस्थेत असून, दोन वर्षआधी या पूलाचा अर्धा भागदेखील वाहून गेला होता. दरम्यान या पुलाशेजारी नवा पूल बांधण्यात येतोय. मात्र दोन लोकप्रतिनिधि आणि खासदारांच्या हेवेदाव्यामुळे हा पूल 15 वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे.तर नांदेड शहरात काल रात्री झालेल्या पहिल्याच पावसामुळं नांदेडकरांची दाणादाण उडालीय. शहरातील हिंगोली गेटचा अंडरब्रीज पाण्याखाली गेलाय. या अंडरब्रीज मध्ये साचलेल्या पाण्यात कार अडकली होती. स्थानिकांनी  जीव धोक्यात टाकून ती कार बाहेर काढली गेलीय. दत्तनगर,विष्णुनगर या सखल भागातील 25 घरांत पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांना जिवमुठीत धरुन रात्र भर पाण्यात  काढावी लागलीय. या पावसामुळे महापालिकेने पावसाळ्यापुर्व केलेल्या तयारी च्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे.

यासह हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री व सकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे,या पावसामुळे कळमनुरी औंढा तालुक्यातील अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाल आहे, तर लाख ,मेथा गावात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली जनावरे वाहून गेल्याने या जनावरांना जलसमाधी मिळाली आहे, यामध्ये गाय म्हशी व बैलांच समावेश आहे,  हिवरा गावातील शिवारात या महापुरामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन हळद आणि मक्याचे पीक पाण्याखाली दबले आहे, शहरातील महत्त्वाची असलेली कयाधू नदी देखील या पावसामुळे वाहत आहे, दरम्यान काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे, या परिसरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतायत. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. दरम्यान धारूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्यानं दोन गावांना जोडणारा पूल खचलाय. घागरवाडा आणि धारूर या मुख्य गावांना जोडला जाणारा नदीवरील पुलाला काही दिवसांपासून भगदाड होतं. परंतु मुसळधार पडत असलेल्या पावसानं हा पूल खचलाय. त्यामुळे जीव मुठीत धरून येथील ग्रामस्थांना हा पूल ओलांडून जावं लागतंय. प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. 

तर इकडे वाशिम जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात संततधार पाऊस सुरू आहे. या  पावसामुळं सोयाबीन, कापूस, तूर, हळद, मूग, या सारख्या खरिपातील पिकांना मोठा आधार मिळालाय. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्यानंतर आता पुन्हा पावसाचं आगमन झाल्यानं पिकांना जीवदान मिळालंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live