महाविकास आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी, महाजॉब्स योजना ठरली तणावाचं कारण

साम टीव्ही
गुरुवार, 16 जुलै 2020
  • महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी
  • महाजॉब्स योजना ठरली तणावाचं कारण
  • योजनेच्या जाहिरात काँग्रेस नेतेच नाहीत

महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय. यावेळीही काँग्रेसने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीय. नेमकं नाराजीचं कारण काय पाहा-

सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं आहे की फक्त शिवसेना-राष्ट्रवादीचं, असा संतप्त सवाल काँग्रेस नेत्यांनी केलाय. काँग्रेसच्या संतापाला कारण ठरलीय ती महाजॉब्स या सरकारी पोर्टलची जाहिरात. या जाहिरातीतून काँग्रेस नेत्यांना वगळण्यात आल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत. 

राज्यातील बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाकरे सरकारने अलिकडेच 'महाजॉब्स' हे ऑनलाइन पोर्टल सुरू केलं. या 'महाजॉब्स' पोर्टलच्या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुभाष देसाई, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक आणि आदिती तटकरे यांची छायाचित्रं आहेत. काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचं छायाचित्र या जाहिरातीत नाहीए. 

'महाविकास आघाडी होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि शिष्टाचाराची अंमलबजावणी का होत नाही? असा सवाल काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंनी केलाय

आघाडी सरकारवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची छाप असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. शिवाय निर्णय प्रक्रियेतून काँग्रेसला डावललं जात असल्याचीही काँग्रेस नेत्यांची भावना आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यावर पडदा पडला होता. आता मात्र महाजॉब्सच्या जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा तीच खदखद बाहेर आलीय. काँग्रेसची ही नाराजी वेळीच दूर न केल्यास सरकारच्या स्थैर्यासाठी ते घातक असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live