'मन फकिरा'च्या टीमचे हटके प्रमोशन; चक्क रस्त्यात पोस्टर धरून केले आवाहन

'मन फकिरा'च्या टीमचे हटके प्रमोशन; चक्क रस्त्यात पोस्टर धरून केले आवाहन

मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मायबाप प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जातात. मुंबईत विलेपार्ले आणि अंधेरी येथे तसेच पुणे येथील गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरत जेव्हा रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

रविवारी १ मार्चला विलेपार्ले आणि अंधेरी येथे आणि सोमवारी २ मार्चला गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे ही मंडळी चक्क फलक घेऊन उभे असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या हातात अत्यंत कल्पक व लक्ष वेधून घेणारे फलक होते. ‘आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही तुमच्याकडे आलोय, तुम्ही थिएटरमध्ये तरी या...’, ‘आमचा सिनेमा तुम्ही आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी ते अगदी तुमच्या ‘एक्स’सोबतही पाहू शकता’, ‘मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी सिनेमा चालणार कसा?’, असे फलक घेऊन हे कलाकार हमरस्त्यात उभे होते. लोकही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते आणि चित्रपटासाठी येण्याचे आश्वासनही या कलाकारांना देत होते. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मन फकिरा’ येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. 

आपल्या चित्रपटाबद्दलची त्यांची आत्मीयता त्यांच्या या कृतीतून झळकत होती. “मराठी चित्रपटसृष्टीत आज नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे. माझ्या भूमिका असलेल्या चित्रपटांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पण माध्यमांच्या भडीमारामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी होते की काय, अशी भिती वाटत आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावा आणि आमच्या वेगळ्या प्रयत्नाला त्याने पाठबळ द्यावे, म्हणून आम्ही हा ‘हटके’ मार्ग अवलंबला,” असे उद्गार मृण्मयीने काढले.

Web Title: marathi news 'mann fakira' team did something unique for movie promotion.....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com