अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 जुलै 2019

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप कमी होण्याची चिन्हे नाहीत. सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री अकरा वाजता जाहीर झाल्यानंतर शनिवारी त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शाळेत गेले. पण, तेथे त्यांच्या वाट्याला त्रास होताच. हरकतीचे अर्ज घेण्याबाबत कोणतीही सूचना या शाळांना दिलेली नाही. त्यामुळे काही पालकांनी मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. पण, तेथेही हरकती घेतल्या नाहीत. अखेर पालकांना पावसात धावपळ करून उपसंचालक कार्यालयात हे अर्ज जमा करावे लागले. 

प्रवेशाची गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जाहीर होणार होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाऊन शहानिशा करीत होते. नऊ वाजून गेल्यावरही यादी दिसत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले. यादी प्रसिद्ध का होत नाही, याची माहिती घेण्यासाठी पालकांनी माहितीपुस्तिकेतील अधिकाऱ्यांच्या क्रमांकावर दूरध्वनी केले. पण, कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांकडे विचारणा करण्यास सुरवात केली. माध्यमांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, यादी तपासण्यात वेळ गेल्याचे गमतीशीर उत्तर या प्रक्रियेच्या प्रमुख अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी दिले. 

सकाळी गुणवत्ता यादी पाहून विद्यार्थी हरकतींचे अर्ज देण्यासाठी त्यांच्या शाळेत गेले असता, आमच्याकडे आता लॉगिन राहिलेले नाही, आम्हाला याबद्दल काही सांगण्यात आले नाही, असे त्यांना ऐकायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मार्गदर्शन केंद्रांकडे धाव घेतली. तेथेही हरकतींचे अर्ज घेतलेले नसल्याने पावसात धावपळ करीत पालक अखेर कॅंप भागातील उपसंचालक कार्यालयात गेले आणि तिथे अर्ज जमा करून घेण्यात आले. 

सिंहगड रस्ता भागातील एका पालकाने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "हरकतीच्या अर्जांवर ते कुठे द्यायचे आहेत, याबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कुणीही अर्ज घेतले नाही. यामुळे धावपळीबरोबरच मनस्ताप सहन करावा लागला. माहितीपुस्तिकेतील अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दूरध्वनी केले. परंतु, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.'' 

अधिकारी 'गायब' 
सहायक शिक्षण संचालक प्रवीण आहेर यांना विद्यार्थी व पालकांच्या गैरसोयीबाबत विचारण्यासाठी वारंवार संपर्क केला. पण, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असता, या प्रकाराची दखल घेऊन यापुढे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सायंकाळी उशिरा मीनाक्षी राऊत यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला आणि या प्रक्रियेत सुधारणा केली जाईल, असे सांगितले.

Web Title: Many problems in XI standard admission process

संबंधित बातम्या

Saam TV Live