मराठा आंदोलकांवरील केसेस शासनाने विनाअट मागे घ्याव्यात - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : "मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान हजारो युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने या सर्व केसेस विनाअट मागे घ्याव्यात,'' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील नेते अजित पवार यांनी केली.

मुंबई : "मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान हजारो युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने या सर्व केसेस विनाअट मागे घ्याव्यात,'' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील नेते अजित पवार यांनी केली.

आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गुरुवारी दुपारी जाऊन भेटले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, "राज्यशासनाने मराठा आंदोलकांच्या विरुद्ध असलेल्या केसेस सरसकट मागे घ्याव्यात. त्यात भेदभाव करू नये. आरक्षणासाठी बलिदान केलेल्या चाळीस युवकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत करण्याची घोषणा शासनाने केली होती. काही जणांना ती मदत मिळाली. ती सर्वांना मिळायला हवी.''

अजित पवार पुढे म्हणाले, "सकल मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. एकूण 58 मोर्चे निघाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 40 जणांनी बलिदान केले. आज सुदैवाने चांगला दिवस उजडला आहे. आज सर्व आमदारांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत केले आहे. आता लवकर नोकरभरती सुरू व्हावी. रंजल्यागांजल्या युवकांना या आरक्षणाचा लाभ मिळायला हवा.''

विधेयकात कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी आपण आग्रही होतो असे सांगून अजित पवार पुढे म्हणाले, "या विषयावर आम्ही आठ दिवस सभागृह चालू दिले नाही. आरक्षण मिळालेच पण ते कायद्यावर टिकावे यासाठी आम्ही आग्रही होतो आणि पुढेही आग्रही राहणार आहोत. मराठा समाजातील युवक-युवतींना शिक्षणविषयक सवलतीसुद्धा तातडीने मिळाव्यात. मराठा समाज यात्रेतल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन माझ्याकडे द्यावे. आज सायंकाळी अन्य एका कारणाने आमची मुख्यमंत्र्यांशी भेट होईल तेव्हा हा विषय आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. आता संघटनेत फूट पडू देऊ नका. एकोपा ठेवा. सर्वांच्या कष्टाने आणि प्रयत्नांनी हे आरक्षण मिळाले आहे.''


संबंधित बातम्या

Saam TV Live