पोलिस भरतीच्या निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक, पुणे-मुंबईला होणारा दूध पुरवठादेखील अडवणार...

साम टीव्ही
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

राज्यभरात मराठा आंदोलकांनी एल्गार पुकारलाय. पोलिस भरती करण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मराठा समाज आक्रमक झालाय. त्यामुळे सरकारसमोर त्यांना रोखण्याचं मोठं आव्हान आहे.

राज्यभरात मराठा आंदोलकांनी एल्गार पुकारलाय. पोलिस भरती करण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण मराठा समाज आक्रमक झालाय. त्यामुळे सरकारसमोर त्यांना रोखण्याचं मोठं आव्हान आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज कोल्हापूरमध्ये आंदोलनाला सुरुवात झालीय. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असून,त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत, रस्ता अडवून धरलाय. या आंदोलकांनी गोकुळ दूध संघासमोर ठिय्या दिलाय.

तसंच पोलिस भरती रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केलीय.  आरक्षणप्रश्नी आक्रमक झालेले मराठा आंदोलक, पुणे-मुंबईला होणारा दूध पुरवठादेखील अडवून धऱणार आहेत. या आंदोलकांची कोल्हापूर पोलिसांनी धरपकडदेखील केलीय.  या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या  निवासस्थानावर मोर्चा काढत धरणं आंदोलन सुरू आहे.. मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शेकडो कार्यकर्ते आंदोलन करताना दिसतायत. आंदोलनात सकल मराठा, छावा संघटनेसह अनेक संघटना सामिल झाल्यात. आरक्षणाचा अध्यादेश त्वरीत काढा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केलीय. अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अशोक चव्हाण यांनी बाहेर येऊन निवेदन स्विकारावं आणि म्हणणं ऐकूण घ्यावं अशी मागणी करण्यात आलीय. सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जातेय. 

जालन्यात मराठा महासंघाच्या आंदोलकांना अटक करण्यात आलीय. या आंदोलकांनी ,पालकमंत्री राजेश टोपे यांना घेरावा घालण्याचा प्रयत्न केला. शहरातील टाऊन हॉल परीसरात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपल्यानंतर हा प्रकार घडला.मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या,एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी 7 ते 8 कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरणदेखील निर्माण झालं होतं.  

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयक कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यात. त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना आरक्षणाबाबत निवेदन दिलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live