राज्यात लवकरच पुन्हा मराठ्यांचा एल्गार, जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलनं करणार

साम टीव्ही
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020
  • राज्यात लवकरच पुन्हा मराठ्यांचा एल्गार
  • जिल्ह्या-जिल्ह्यात आंदोलनं करणार
  • रविवारी बैठक घेऊन आंदोलनांबाबतचा निर्णय
  • मराठा समन्वयकांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

मराठा आरक्षणप्रश्न मागे हटणार नाही. आरक्षणप्रश्नी सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी. अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मराठा आरक्षणप्रश्नी वर्षा बंगल्यावर उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समन्वयक तसच मराठा नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

दरम्यान येत्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरावर बैठका घेऊन राज्यभरात जिल्हा जिल्ह्यात आंदोलन करण्याचा निर्णय मराठा समन्वयांनी घेतलाय. मराठा आरक्षणासंदर्भात आज मराठा समन्वयांची बैठक झाली. या बैठकीत आरक्षणाबाबत मराठा नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक होण्याचा निर्णय घेतलाय. त्याच अनुषंघाने पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाचा नारा देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा मराठा नेत्यांनी दिलाय. 

 जालन्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत . मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्यात. जालन्यातील घनसावंगी शहराजवळ ही घटना घडलीय. बसमधील प्रवाशांना बसमधून उतरवून तोडफोड करण्यात आलेय. अंबड आगाराच्या बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्यात. काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिली होती.. त्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत बसच्या समोरील आणि मागील बाजूच्या काचा फोडल्यात. यामध्ये बसचं नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेय. पोलीस या प्रकरणात आता अधिक तपास करतायत.

एकीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरून मराठा समाज आक्रमक झालाय. तर दुसरीक़डे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावरील स्थगितीबाबत अध्यादेशाचा पर्याय सुचवलाय. मराठा आरक्षणाबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत असंही शरद पवारांनी म्हंटलंय. तर दुसरीकडे अध्यादेशामुळे प्रश्न सुटणार नाही. अध्यादेश कोर्टात टिकणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live