ऑनलाइन युझर्सची दुसरी दुनिया! 

ऑनलाइन युझर्सची दुसरी दुनिया! 

"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. 

गेल्या वर्षभरात भारतातील युझर्सचा "सर्च ट्रेंड' पाहिला, तर एक समान धागा सापडतो. राजकीय नेते ज्या गोष्टींवरून आरडाओरडा करत असतात आणि प्रसिद्धी माध्यमंही ज्या वादांना खमंग फोडणी देत असतात, त्यापैकी काहीच या ऑनलाइन युझर्सच्या "टॉप सर्च'च्या यादीत नाही. उदाहरणार्थ, गेल्या वर्षभरात सर्वाधिक "सर्च' झालेली व्यक्ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर! तीच ती.. डोळे मिचकाविण्याच्या व्हिडिओमुळे 'इंटरनेट सेन्सेशन' ठरलेली.. त्याच यादीत पुढे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास, सपना चौधरी, आनंद अहुजा यांचा समावेश आहे. "व्हॉट इज'ने सुरवात झालेल्या "सर्च'मध्येही '377 कलम काय आहे', "सीरियामध्ये काय सुरू आहे', "किकी चॅलेंज काय आहे' असेच विषय आहेत. राजकारण या विषयातील दोन घटनांना "बातम्यां'च्या यादीत स्थान मिळाले आहे. ते म्हणजे कर्नाटक निवडणूक आणि गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी! रोजच्या रोज बातम्यांमध्ये झळकणारे राजकीय नेते किंवा इतर व्यक्ती "गुगल'वरच्या "टॉप 10 सर्च'मध्ये कुठेही नाहीत. राजकीय नेत्यांचं आणि राजकीय विषयांचं अजीर्ण झालं आहे का, हा विचारदेखील यातून करावा लागेल. 

"गुगल'च्या या यादीतून काही गंमतीशीर गोष्टीही बाहेर आल्या आहेत. "तुमच्या भुवया कशा काढायच्या' हा प्रश्‍न सर्वाधिक वेळा विचारला गेला. याचाच अर्थ, तुमचा युझर ऑनलाइन काय शोधत असतो, याचा अंदाज यातून प्रसिद्धीमाध्यमे, जाहिरात एजन्सी आणि डाटा गोळा करणाऱ्या कंपन्यांना मिळत असतो. रजनीकांत आणि अक्षयकुमारचा '2.0' हा चित्रपट वर्षभर चर्चेत होता. शिवाय, भारतातील युझर्सला पडलेला सर्वांत गहन प्रश्‍न म्हणजे "व्हॉट्‌सऍपवर स्टिकर्स कशी पाठवायची' हा! सोशल मीडिया आपलं आयुष्य कसं व्यापत चाललं आहे, याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे प्रिया प्रकाश वारियर आणि "व्हॉट्‌सऍप स्टिकर्स'संदर्भातील प्रश्‍न.. कारण, प्रिया प्रकाशचा तो व्हिडिओ ज्या चित्रपटातील होता, तो बहुतांश युझर्सने पाहिलाही नसेल; तरीही भारतातील प्रत्येक इंटरनेट युझरला तिच्याविषयी माहिती आहे. याचं कारण सोशल मीडियावर तयार झालेले मीम्स! हे सगळं हलकंफुलकं झालं; पण यातून एक महत्त्वाचा मुद्दाही पुन्हा समोर येत आहे. तो म्हणजे डेटा सिक्‍युरिटी! आपला सगळा डेटा "गुगल'कडे आहे आणि युझर्सच्या खासगी माहितीची सुरक्षा कितपत आहे, याचा अंदाज "फेसबुक', "केंब्रिज ऍनॅलिटिका' आणि खुद्द "गुगल'विरुद्ध युरोपीय समुदायामध्ये सुरू असलेल्या खटल्यांमधून येतच आहे. त्यामुळे एकीकडे सामान्य "डेटा सेट' म्हणून जी माहिती उपलब्ध आहे, तीच एखाद्या युझरची खासगी माहितीही उघड करणारी ठरू शकते, याचं भान राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

(लेखक सायबर क्राईम तज्ज्ञ आहेत) 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com