म्हसदी : गेल्या पाच दिवसापासून मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याने आज सकाळी येथील तरुण शेतकऱ्यांवर हल्ला चढविला. बिबट्याला पकडण्यासाठी उमराड शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात दोन कुत्रे सोडूनही बिबट्या अडकला नाही. कुत्री पिंजऱ्यात तर बिबट्या आजही सैरभैर आहे. दुसरीकडे तासी चाळीस किमी धावणारा बिबट्या अवघे पाचशे मीटर अंतरही पार करत नसल्याचे रहस्य वाढत आहे. मग बिबट्या आजारी तर नसेल ना अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वनविभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे.
तरूणावर हल्ला
दोन दिवसापूर्वी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारा बिबट्या रविवारी उमराड शिवारात सैरभैर होत फिरताना अनेकांनी पाहिले.वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करूनही जेरबंद होऊ शकला नाही. रात्री देऊर रस्त्यावरील धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे माजी अध्यक्ष हिंमतराव देवरे यांच्या शेतात दाखल झाला. आज पहाटे दुध काढण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी दादाजी फकिरा खैरनार यांच्यावर हल्ला केला. भटू खैरनार, विठ्ठल खैरनार व इतर शेतकरी लगत असल्याने जखमी खैरनार यांचा जीव वाचला असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
ग्रामस्थच तळठोकून
जखमी खैरनार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागास माहिती दिल्यावर आज सकाळपासून सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, वनक्षेत्रपाल महेश पाटील, पिंपळनेरचे वनक्षेत्रपाल अरुण माळके, धुळे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, वनपाल मुकेश सोनार, एस. डी. देवरे (म्हसदी), वनरक्षक राकेश पाटील, हर्षाली अहिरे, चेतन काळे, अनिल पाटील, ज्ञानेश्वर बागले, बापू पाटील, झुलाल बाविस्कर तळ ठोकून आहेत. देऊर रस्त्यावरील शेतशिवारात बिबट्या असल्याने बघ्यांची गर्दी होते.यापार्श्वभूमीवर कालपासून(ता.22)धुळे तालुक्याचे पोलिस बंदोबस्तासाठी आहेत.
जाचक नियमावलीमुळे दिरंगाई!
बिबट्या सुरक्षित जेरबंद व्हावा म्हणून प्रत्येक ठिकाणी वनविभाग व वन कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करतात. ग्रामस्थांना भयमुक्त करावे; म्हणून प्रामाणिक प्रयत्नही असतात. पिंजरा लावून बंदिस्त करणे वा भूल देऊन जेरबंद करणे हे प्रमुख पर्याय वन विभागाकडे असतात. यासाठी वनविभागाच्या नागपूर येथील प्रमुख कार्यालयाची परवानगी आवश्यक असते हे वास्तव आहे. या प्रक्रियेसाठी बराच वेळ जातो. अशावेळी वन्य पशूपासून धोकाही नाकारता येत नाही. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. तो सुरक्षित जेरबंद व्हावा म्हणून वनविभाग प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. जाचक नियमावलीमुळे विलंब लागत आहे. दुसरीकडे अधिक धोका नको म्हणून बिबट्यास तात्काळ जेरबंद करा अशी मागणी केली जात आहे.
Web Title: marathi news dhule mhasdi bibtya boy atack