माथेरानची राणी वर्षभर बंद

माथेरानची राणी वर्षभर बंद


माथेरानच्या मिनी ट्रेनची मान्सूनमध्ये सुरू असलेली अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवादेखील यंदा बंद ठेवण्याची वेळ अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेवर आली आहे. 
ही सेवा अपेक्षेप्रमाणे ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नसून या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्ववत करण्यासाठी मोठय़ा दुरुस्तीची गरज असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.  माथेरानच्या राणीची सफर यंदा विलंबाने सुरू होणार आहे. कारण नेरळ ते माथेरान हा सुमारे 20 कि.मी.चा पट्टा जुलै व ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीने अक्षरशः उद्ध्वस्त झाला असून नऊ ठिकाणी जमीन खचल्याने ट्रक व खडीचे प्रचंड नुकसान झाल्याने हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी 20 कोटी रुपयांची गरज आहे.

जुलै महिन्यातील पावसाने यंदा कर्जत-लोणावळासह इतरत्रही रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान केले असताना प्रख्यात हिल स्टेशनवरील हा मार्गदेखील त्यातून वाचलेला नाही. या मार्गावरील डोंगराच्या कडाच पावसाने वाहून गेल्या असून ट्रकसह तो भाग पुन्हा उभारणे मोठे जिकिरीचे काम असल्याचे एका अधिकाऱयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारेच 26 जुलै 2005 च्या पावसात या मार्गाचे प्रचंड नुकसान होऊन पन्नास टक्क्यांहून अधिक प्रमाणात हा नॅरोगेज मार्ग वाहून गेल्याने तो पूर्ववत करण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली होती. 

संपूर्ण मार्ग सुरू करण्याऐवजी त्यातल्या त्यात अमन लॉज ते माथेरान ही 'शटल सेवा' तरी निदान येथील ग्रामस्थांसाठी चालू करण्याची मध्य रेल्वेची प्राथमिकता आहे. परंतु त्यासाठी यार्ड आणि मेंटेनन्सची सुविधा जी सध्या नेरळमध्ये खालच्या भागात आहे ती वरच्या घाटमाथ्यावर हलवावी लागणार आहे. या कामासाठीदेखील सहा कोटी रुपयांची गरज असून रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून या कामासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे येथे इतक्या उंचीवर दुरुस्तीसाठीचे साहित्य वाहून नेण्यासाठी खेचरांचा किंवा मानवी डोक्यावरून अवजड सामग्री वाहून नेण्याचे कठीण काम येथे करावे लागते. येथे वाहनांना बंदी असल्याने स्थानिक नगर परिषदेचे अधिकारी व वन खाते आम्हाला कायद्याचा धाक दाखवून काम बंद पाडत असते, मग हा मार्ग कोणासाठी सुरू करायचा, असा सवालच या अधिकाऱयाने केला आहे.
 

WebTittle : Matheran mini train issue  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com