कोरोनासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज; मास्कचा तुटवडा

कोरोनासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज; मास्कचा तुटवडा

जळगाव : चीनसह इतर देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण भारतात देखील आढळून येत आहे. यामुळे सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आज शहरातील मल्टीस्पेशलिस्ट रुग्णांसह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाची पाहणी केली असता. याठिकाणी कोरोनाला रोखण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याचे दिसून आले. 

चीनसह 14 देशांमध्ये कोरोनाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला असून अनेक देशांमध्ये कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भारतात देखील या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. देशात या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने जिल्हा प्रशासनाला वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयासह शहरातील सर्व मल्टीस्पेशलीस्ट रुग्णालयात "सकाळ'च्या प्रतिनिधींकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीत जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी महिलांसाठी दोन व पुरुषांसाठी दोन असे चार बेड असून त्याठिकाणी व्हेंटीलेटरसह सर्व अद्ययावत सोयी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. 

स्वतंत्र कक्ष नाही, मात्र उपचारासाठी यंत्रणा सज्ज 
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र खासगी रुग्णालयात माहिती जाणून घेतली असता. त्याठिकाणी स्वतंत्र कक्ष नाही, मात्र या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग असून कोरोना संशयित रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती शहरातील मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय प्रशासनाने दिली. 

संसर्गामुळे कोरोनाचा प्रसार 
कोरोना व्हायरसचे विषाणू हे संशयिताच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लागण होते. सर्दी, खोकला, ताप यासह मांसपेशी दुखणे ही त्याची लक्षणे आहे. कोरोना आजाराची लक्षणे असलेल्यांना किमान 14 दिवस स्वतंत्र कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असतो. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात अधिक काळ आल्याने तसेच संसर्गामुळे कोरोनाची लागण होण्याची दाट शक्‍यता असते. 

अशी घ्यावी काळजी 
सर्दी, खोकला, ताप व अंग दुखी ही करोनाची लक्षणे आहे. ही लक्षणे अधिक काळ जाणवत असल्यास नागरिकांनी तत्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हस्तांदोलन करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जात असताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, रुग्णालयात जाताना किंवा रुग्णासोबत बोलताना मास्क लावूनच त्याच्यासोबत संवाद साधावा, आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. 
 
शहरात मास्कचा तुटवडा 
भारतात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून स्वतः:ची काळजी घेतली जात असून नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्राहकांकडून मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे, मात्र कंपनीकडून मास्कचा पुरवठा होत नसल्याने शहरातील औषधीविक्रीच्या दुकानांवर मास्कचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे मास्क विक्रेत्यांनी सांगितले. 
 
बाजारात विविध प्रकारचे मास्क 
बाजारात अनेक प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले असून यामध्ये डिसपोझल मास्क, एन 95 व्हायरस मास्क, पोल्यूशन मास्क यासह कपड्यापासून तयार करण्यात आलेले मास्क विक्रीसाठी आले आहे. 10 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत या मास्कची विक्री केली जात असून ग्राहकांकडून याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. 
 
 
जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी कोरोना विषाणूची लागण झालेला संशयित रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णासाठी स्वतंत्र कक्षात उपचार करावेत. तसेच त्याच्या रक्ताचे नमून्यांसह थ्रोट स्वॅप (थुंकीचे नमुने) घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवून याबाबत तत्काळ जिल्हा प्रशासनास माहिती द्यावी. 
-डॉ. भास्कर खैरे, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता 
 

Web Title: marathi news Medical system ready for Corona; Break the mask

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com