उदयनराजेंना वगळून शरद पवारांच्या निवासस्थानी सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची गुप्त बैठक 

उदयनराजेंना वगळून शरद पवारांच्या निवासस्थानी सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची गुप्त बैठक 

सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार हे आज स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी आज सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीविषयी चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर सर्वच आमदारांनी सकाळ प्रतिनिधींशी थेट भाष्य करणे टाळत गोविंदबागेतून निघून जाणे पसंत केले. 

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे या बैठकीस उपस्थित होते. 
मात्र एकंदरीत बैठकीचे गुप्त स्वरुप विचारात घेता या बैठकीत आगामी राजकीय आडाखे काय आखायचे याचीच चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  आज सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग येथे उपस्थित झाले. ही सभा अत्यंत गोपनीय असल्याने कोणालाच या बाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. 

उदयनराजे भोसले यांनी फसवाफसवी करु नका, नाहीतर आम्हालाही कळतं असे विधान केले होते, त्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख आमदारांची झालेली बैठक राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाची मानली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनाचा थांगपत्ता कधीच कोणाला लागत नाही, त्यांच्या राजकीय डावपेचांचाही अंदाज भल्या भल्यांना येत नसल्याने या गुप्त बैठकीमागे नेमके काय राजकारण असावे याचाच अंदाज सगळीकडे बांधला जात आहे. 

या बैठकीनंतर सकाळ प्रतिनिधीने आमदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र घाईत सर्वच आमदार निघून गेले. मकरंद पाटील यांनी केवळ जिल्ह्याच्या विकासकामांबाबत काही प्रश्नांवर पवारसाहेबांना चर्चा करायची होती, त्या साठी सर्व आमदारांना पाचारण केले होते इतके जुजबी सांगितले. 
या बैठकीनंतर रामराजे निंबाळकर व शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या गाडीत बसून पुण्याकडे रवाना झाले.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com