पुण्यात ४८ तासांमध्ये पारा सहा अंशांनी घसरला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

का घटले तापमान?
बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘फनी’ चक्रीवादळाचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. शहरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे चाळिशीपार गेलेले कमाल तापमान सरासरीपर्यंत कमी झाले आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुणे परिसरात येत्या शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे- तुम्हाला मळमळ होतेय, मानसिक अस्वस्थता जाणवतेय किंवा बद्धकोष्ठता, जुलाब असे काही झाले; तर हा सगळा कमाल तापमानात अचानक झालेल्या बदलांचा त्रास असू शकतो. कारण, पुण्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये ३७.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.

शहरात रविवारी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ५.१ अंश सेल्सिअसने वाढून ते ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर, मंगळवारी संध्याकाळपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा ०.२ अंश सेल्सिअसने कमी झाले. या दोन दिवसांमध्ये ५.३ अंश सेल्सिअसने कमाल तापमान अचानक कमी झाले. या बदलाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होण्याचा धोका असतो. याबाबत काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप कदम म्हणाले, ‘‘तापमानात  अचानक झालेल्या बदलामुळे हवेतील विषाणू सक्रिय होतात. त्यामुळे त्यातून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. त्याच वेळी काही रुग्णांना मळमळ होणे, पचनसंस्थेवर परिणाम होतो, मानसिक अस्वस्थता, अशी लक्षणेही दिसतात.’’

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील साथरोग सर्वेक्षणप्रमुख डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘‘तापमानात झपाट्याने झालेल्या बदलांमुळे शरीरातील समायोजन शक्‍तीपुढे मोठे आव्हान उभे राहते. ही तापमानवाढ काही विषाणूंसाठी पोषक असते, तर काही जंतू यात तग धरू शकत नाहीत. त्यामुळे ज्या भागात एवढी तापमानवाढ नसते, तेथे नव्या आजाराच्या रोगांचे जंतू पसरण्याचा धोका असतो. हा हवामानातील बदलाचा दुष्परिणाम आहे.’’

बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘खूप मोठ्या प्रमाणात तापमानात बदल झाला, तर त्याचा थेट परिणाम श्‍वसनसंस्थेवर होतो. आता नोंदले गेलेले तापमान हे शरीराच्या सामान्य तापमानाइतकेच आहे.’’

का घटले तापमान?
बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘फनी’ चक्रीवादळाचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. शहरात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे चाळिशीपार गेलेले कमाल तापमान सरासरीपर्यंत कमी झाले आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुणे परिसरात येत्या शनिवारी (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ब्रह्मपूर ४७ अंश सेल्सिअस
उष्णतेच्या अतितीव्र लाटेमुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे काही भागांत उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

चक्रीवादळाची तीव्रता वाढली 
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘फनी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. चक्रीवादळामुळे ताशी १६ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. येत्या बुधवारी (ता. १) या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असून, वारे वेगाने वाढण्याची शक्‍यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील दक्षिणेकडील भाग व विदर्भातील काही भागांत होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काही भागांत अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

Web Title: marathi news mercury dropped by six points in pune


संबंधित बातम्या

Saam TV Live