समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांना सासवडमध्ये मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मे 2019

सासवड : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 63, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडीतील कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. एकबोटे हे कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहेत. 

सासवड : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 63, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडीतील कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. एकबोटे हे कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहेत. 
दरम्यान, एकबोटे यांना मारहाण केल्याचा गुन्हा सासवड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक, निखिल दरेकर व इतर 40 ते 50 (यांचे नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकबोटे यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील कोणालाही अद्याप अटक केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

एकबोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकबोटे हे मंगळवारी पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडी येथील मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी प्रवचन करीत असताना पंडित मोडक यांनी अचानक येऊन एकबोटे यांना शिवीगाळ करून सासवडमध्ये राहायचे नाही का, अशी धमकी दिली. त्या वेळेस त्यांच्याबरोबर इतर 40 ते 50 तरुण मुले होती. त्यांच्याकडे एकबोटनी दुर्लक्ष करून प्रवचन चालू ठेवले. 

प्रवचन संपल्यानंतर रात्री पावणे अकरा वाजता ते शनी मंदिरासमोर जेवण करण्यासाठी खाली बसले होते. तेथे 40 ते 50 तरुण घुसले. जेवणाच्या पत्रावळीवर पाय देऊन अर्वाच्च शिवीगाळ करून कार्यकर्त्यांना मारहाण केली. विवेक मोडक यांच्या सांगण्यावरून एकबोटे यांना काहींनी मारहाण केली. त्यामध्ये एकबोटेंच्या सोबत असलेल्या अभिषेक वाघमोडे याला उजव्या हाताचे मनगटाजवळ चाकूने तसेच पाठीवर, डोक्‍यावर मारहाण केली. एकबोटे यांचे कार्यकर्ते प्रतीक गायकवाड यालाही मारहाण केली. जमावातील लोकांनी डोळ्यांत मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पंडित मोडक यांनी चिथावणी दिल्यामुळे घडला आहे. 

गोरक्षणासंदर्भात एक महिन्यापूर्वी फेसबुकवर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यावर एकबोटे यांनी सबुरीची प्रतिक्रिया दिली होती. म्हणून पंडित मोडक यांच्या मनात माझ्याविषयी राग होता. त्यातून हा प्रकार घडला आहे, असे एकबोटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  

Web Title: Milind Ekbote assaulted in Saswad


संबंधित बातम्या

Saam TV Live