दूध दर प्रश्नी पाच रुपये अनुदानाचा निर्णय सरकारने जाहीर करावा : राजू शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

माझ्याशी चर्चा न करता निर्णय घेतला तरी चालेल. पण, ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार

मुंबई : दूध दर प्रश्नी पाच रुपये अनुदानाचा निर्णय सरकारने जाहीर करावा. माझ्याशी चर्चा न करता निर्णय घेतला तरी चालेल. पण, ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान देण्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याचे पाहून खासदार राजू शेट्टी यांनी आज (गुरुवार) राज्यभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आज चौथ्या दिवशीही राज्यात दूध आंदोलनाची धग कायम आहे. 

राजू शेट्टी म्हणाले, की ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना अटक झाली असून, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. दुध आंदोलनाला व्यापक पाठींबा मिळत आहे. मनसेचाही पाठींबा मिळत आहे. ग्राहक संघटनेने शेतकर्‍यांचा निषेध करण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत येणाऱ्या भेसळीचे दुधाविषयी काळजी करायला पाहिजे. आज पावडरचे दूध बाजारात विकले जात आहे.  सदाभाऊ खोत यांची पूर्वीची भूमिका नाटकी होती किंवा आता ते सत्तेसाठी खोटे बोलत आहेत. दुधाला 26 ते 27 रुपये भाव मिळाला पाहिजे. दुध कंपन्यांना सवलत देताना शेतकऱ्यांना 27 रुपये भाव देण्याचं निश्चित करा. त्यांना अनुदान देताना शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे.

Web Title: Milk Agitation Raju Shetty criticized government on Milk Agitation

 


संबंधित बातम्या

Saam TV Live