दूध दरवाढीसंदर्भातील आंदोलनाची आजची परिस्थिती काय आहे वाचा... हजारो लिटर दूध रस्त्यावर...

साम टीव्ही
मंगळवार, 21 जुलै 2020

शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे.  तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानीने आंदोलन पुकारलंय. दरम्यान राजू शेट्टी यांनी उदगावच्या रामलिंग मंदिरात दुग्धाभिषेक देखील केला. 

दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी शेतकरी नेते, अधिकारी आणि राज्यभरातील सुमारे 26 दूध संघांच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलंय. कोरोना लॉकडाउनमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

 त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला किमान ३० रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळण्यासाठी राज्यभरात आंदोलन  झालंय. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र सरकारने बैठकांमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी १० रुपये प्रति लिटर थेट अनुदानाची घोषणा करावी, अशी मागणी किसान सभेने केलीय.

शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे.  तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानीने आंदोलन पुकारलंय. दरम्यान राजू शेट्टी यांनी उदगावच्या रामलिंग मंदिरात दुग्धाभिषेक देखील केला. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक झालीय. स्वाभिमानीने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासूनच दूध दर आंदोलन सुरू केलंय. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर, राज्याच्या अनेक भागातून त्याला संमिश्र प्रतिसाद लाभलाय. तसंच भाजपवरही त्यांनी तोंडसुख घेत, त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा नसून ते केवळ राजकारण म्हणून आंदोलन करत असल्याची टीका राजू शेट्टींनी केलीय.

कुठे कसं आंदोलन?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चक्क दुधाने आंघोळ करुन, दूध दरवाढीच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनीदेखील दूधाने आंघोळ करत, केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. दूधाला अनुदान द्यावे आणि वर्जिन जीएसटी रद्द करावा अशा प्रमुख मागण्या आहेत.

दुधाचे दर वाढवून प्रति लिटर दुधाला 10 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर अंदोलनाला सुरूवात केलीये. बुलडाणा जिल्ह्यात देखील आंदोलनाला सुरूवात झालीये. बुलडाण्याच चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालत आपला रोष व्यक्त केलाय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरचे जीएसटी कमी करावा अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आलीये. मागण्या मान्य झाल्या नाही तर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेनं दिलंय.

पश्चिम महाराष्ट्रात दूध आंदोलन पेटलंय. ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात येतय. तिटवे बिद्री परिसरातून काही दृश्यं समोर आली आहे. यावेळी दुधाची वाहतूक करणाऱ्या गाडीतून दुध रस्त्यावर ओतण्यात आलंय. 
दूध दराच्या मागणीसाठी करण्यात आलेलं आंदोलन अधिक आक्रमक होत चालल्याचं पाहायला मिळतंय. दूधाचे कॅन रस्त्यावर फेकून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलीय. बिद्री आणि भोगवतीत दूध वाहतूक करणारी वाहनं सकाळी अडवण्यात आली होती. त्यानंतर या वाहनांमधील दूध रस्त्यावर ओतण्यात आलंय.  तर इकडे नांदनीमध्ये भैरवनाथला अभिषेक घालून दूध आंदोलनाला सुरुवात झाली. गावोगावी शेतकरी देवाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन करत आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातल्या धामोड इथंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आवाहन करूनही दुध वाहतूक बंद न केलेल्या गाडीतील कॅन मधलं दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतलं. 

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मुंबईसह राज्यभरात दुधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी सरकारनेही कंबर कसलीय. याचाच भाग म्हणून सरकारकडून दूधवाहक टँकर्सना पोलीस संरक्षण देत देताना दिसतायत. गोकुळ दुध उत्पादक संघाचे टँकर्स मोठया पोलिस बंदोबस्तात मुंबई आणि पुण्याकडे रवाना झालेत. 

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गोकुळ दूध संघाच्या डेअरीतून दुधाची वाहने बाहेर काढण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे  याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची सुरूवात केल्यानंतर अनेक खाजगी दूध संघानी आपली संकलन केंद्र बंद ठेवली आहेत. तरीही  हिंसक प्रकार टाळण्यासाठी दूध संकलन केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live