दूध भुकटीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान.. मुख्यमंत्र्यांनी दिलेली `डेडलाईन`ही संपली...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018
  •  
  • राज्यात दररोज 1.30 कोटी लिटर दूध उत्पादित 
  • त्यापैकी 60 लाख लिटर पिशवीबंद दुधासाठी 
  • 70 लाख लिटर भुकटी व इतर प्रक्रियेसाठी वापरले जाते. 
  • दूध उत्पादकांना अनुदानासह मिळणारा दर 21 ते 25 रुपये प्रतिलिटर 
  • दूध उत्पादकांचे दुधाच्या पैशाचे थकीत दिवस 65 दिवस. 

भवानीनगर : दूध भुकटीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर करून, योजना सुरू होऊन 75 दिवस उलटल्यानंतरही अजूनही अनुदान जमा नाही. काहींचे थोडे जमा झाले, काहींचे आज-उद्या होईल असे सांगितले जात आहे.

दूध प्रकल्प हे सरकारचा ससेमिरा पाठीशी नको, म्हणून गप्प आहेत..मात्र योजनेतील फक्त 14 दिवस उरलेत, तरीही अजूनही अनुदान जमा झालेले नाही. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेली सोमवारची डेडलाईन सरकारने पाळलेली नाही. अर्थात राजाने झोडपल्यावर दाद कुठे मागायची हा दूध प्रकल्पांपुढे प्रश्न असेल,

राज्यातील खासगी व सहकारी दुध प्रकल्पांचे अनुदानाचे 90 ते 95 कोटी सरकारकडून येणे बाकी आहेत. अनुदानाशिवाय पगार केल्यानंतर प्रकल्पच अडचणीत आल्याने सरकारकडील अनुदान मिळाल्याशिवाय पगार करता येत नाही अशी त्यांची अवस्था आहे, तर इकडे दररोज उसनवारीने सारा खर्च करणाऱ्या दुध उत्पादकांना दसरा, दिवाळी समोर दिसत आहे. अशा स्थितीत अनुदान तर सोडाच, पगारच नसल्याने ते हतबल झाले आहेत.

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळ गेल्यानंतर त्यांनी सोमवारपर्यंत सारे अनुदान जमा होईल असे स्पष्ट केले होते. मात्र काही प्रकल्पांना थोडे अनुदान मिळाले, काहींना काहीच नाही. त्या स्थितीत पगार मात्र थांबले आहेत. परिणामी ग्रामीण भागात बाजारपेठाही मंदीत गेल्या आहेत. 

विशेष म्हणजे दुधाचे अनुदान प्रत्येक दहाव्या दिवशीच दुध संस्थांना दिले जाईल असे सांगणारे सरकार आता मात्र गप्प आहे. तीन महिन्यांच्या या योजनेतील अवघे 14 दिवस आता उरले आहेत. त्यामुळे हे 14 दिवस संपल्यानंतर पुढे योजना सुरू ठेवण्याची मानसिकता व क्षमता खासगी व सहकारी दूध प्रकल्पांची राहील असे दिसत नाही आणि सरकार पैशाची व्यवस्था करीत नसल्याने पुढे सरकारही दूध उत्पादकांना वाऱ्यावरच सोडेल अशीच आजची स्थिती आहे. दुसरीकडे 76 दिवसांच्या या योजनेच्या कालावधीत फक्त पहिल्या दहा दिवसांचे दुधाचे पैसे अनुदानासह मिळाले आहेत. म्हणजे जवळपास 65 दिवसांचे पैसेच अजून दुध उत्पादकांना येणे आहेत.

यासंदर्भात काही दूध उत्पादकांनी मात्र सरकारने आमच्या आंदोलनावर काढलेला तोडगा आता आम्हाला जखमेपेक्षा इलाज भयंकर असाच वाटू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आमचे पगार झाले पाहिजेत, अन्यथा आम्हाला गायी सांभाळणेच कठिण होईल असे सांगितले. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live