दूधाच्या दरासाठी राज्यात आंदोलनाचा भडका, गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेकाचं आंदोलन

साम टीव्ही
शुक्रवार, 31 जुलै 2020
  • दूधाच्या दरासाठी राज्यात आंदोलनाचा भडका
  • गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेकाचं आंदोलन
  • राज्यभरात दूधदरासाठी आंदोलन आणखी तीव्र

उद्यापासून राज्यभरात दूध उत्पादकांचं आंदोलन छेडण्यात येणार आहे. एका दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनानंतरही सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे. दूधाला किमान 30 रुपयांचा खरेदी दर मिळावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात दूधाची मागणी घटल्याने सध्या राज्यभरातल्या अनेक दूधसंघांनी दूध खरेदी बंद केलीय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. त्यातच केंद्र सरकारनेही दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दूधसंघांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येतंय. 

कोरोनाच्या संकटात दुधाची मागणी घटल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. गेल्या काही दिवसांत दूधदरासाठी आंदोलनांचा भडका उडालाय. मात्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन अजून तीव्र होणारेय. मात्र यावेळी आंदोलनाचं स्वरूप वेगळं आहे. गावागावांतील चावड्यांसमोर दुग्धाभिषेक आंदोलन उभारलं जातंय. केलेल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन उभारलं जातंय.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा आणि सरकारने प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. परदेशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. अशीही मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. तसेच जेनेरिक औषधांच्या बदल्यात अमेरिकेतून दूध आणि दुग्ध पदार्थांच्या आयातीला दिलेली परवानगी रद्द करावी. त्याचप्रमाणे गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

खरंतर, ल़कडाऊनमुळे सगळेच उद्योग ठप्प आहेत, तरीही कष्टकरी शेतकरी मात्र, राबत राहतोय. त्यामुळे जगाच्या पोटाला आधार देणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळायलाच हवा. कारण शेतकरी तगला तरच जगाच्या पोटाला अन्नधान्य मिळेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live