मॉन्सून येत्या गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) येत्या गुरुवारपर्यंत (ता. 13) महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील 38 तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, त्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये तो महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) येत्या गुरुवारपर्यंत (ता. 13) महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील 38 तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, त्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये तो महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

सध्या मॉन्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आहे. त्याने श्रीलंकेच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. त्याच वेळी अंदमानच्या समुद्रात उत्तरेकडे त्याने मोठ्या प्रमाणात कूच केली आहे. मॉन्सून केरळमध्ये 6 जूनला दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच जाहीर केला होता. सांख्यिकी प्रारूपच्या आधारावर हा अंदाज वर्तविला होता. त्यात चार दिवस पुढे-मागे होईल, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे पुढील 38 तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये किनारपट्टीवर दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे, असे भारतीय हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. 

केरळ किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे. तेथे पावसाच्या तुरळक सरीदेखील पडू लागल्या आहेत. पश्‍चिमी वाऱ्याची उंची वाढत आहे. त्यातून एक ते दोन दिवसांमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होईल. केरळमध्ये पोचल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावरून कळते मॉन्सून आलाय 

- पश्‍चिमी वाऱ्याचा वेग : पश्‍चिमी वाऱ्याची उंची आणि त्याचा वेग हा मॉन्सूनच्या आगमनाचा एक निकष मानला जातो. या वाऱ्याची उंची चार किलोमीटरपर्यंत मोजली जाते. तसेच, हे वारे ताशी 25 ते 35 किलोमीटर वेगाने आणि एका निश्‍चित दाबाने वाहत असल्यास मॉन्सून पोचल्याचे मानले जाते. 

- पाऊस : सतत पडणाऱ्या पावसाच्या सरी हे मॉन्सूनचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर सातत्याने दोन दिवस अडीच मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होत असल्यास तो पाऊस मॉन्सूनचा असल्याचे शिक्कमोर्तब हवामान खाते करते. 

- "ओआरएल' (आउटगोइंग लॉंगवेव्ह रेडिएशन) :
विशिष्ट भागातील ऊर्जेची स्थिती आणि तेथील उष्णता यांची अचूक माहिती उपग्रहाच्या माध्यमातून हवामान खात्याला मिळते. त्या आधारावर मॉन्सून दाखल झाल्याची वर्दी आपल्याला हवामान खाते देते. 


संबंधित बातम्या

Saam TV Live