पुढील चोवीस तासांत विदर्भात अतिवृष्टी तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे - विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

पुणे - विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

राज्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते रविवारी सकाळी झारखंड आणि ओरिसाच्या प्रदेशात आले. त्यामुळे ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याचा थेट परिणाम पूर्व विदर्भावर देखील होईल. त्यामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाने एक जून ते 22 जुलै या दरम्यान पडणाऱ्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस कोकणात झाला आहे. कोकणात पावसाळ्यातील पहिल्या 52 दिवसांमध्ये एक हजार 489 मिली मीटर पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत सरासरीच्या 45 टक्के जास्त म्हणजे दोन हजार 153 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पडणाऱ्या 316.5 मिली मीटरच्या तुलनेत 404.6 मिलीमीटर (28 टक्के) पाऊस पडला. विदर्भातही सरासरीपेक्षा 30 टक्के जास्त पाऊस नोंदला गेला. मराठवाड्यात मात्र पावसाने सरासरी गाठली आहे. या वर्षी 295.1 मिली मीटर (12 टक्के) पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

पुण्यात आज पाऊस 
शहर आणि परिसरात रविवारी दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. उद्याही (सोमवारी) पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. शहरात 1 जूनपासून आतापर्यंत 315.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 
WebTitle :: marathi news monsoon vidarbha konkan maharashtra heavy rain 


संबंधित बातम्या

Saam TV Live