मुलाच्या निधनामुळे आईला धक्का बसून मृत्यू

मुलाच्या निधनामुळे आईला धक्का बसून मृत्यू

मारतळा: (ता. लोहा, जिल्हा नांदेड) : पोटच्या मुलाच्या निधनाची वार्ता ८३ वर्ष वय असलेल्या वृध्द आईच्या कानावर पडली. पोटच्या गोळ्याचे निधन झालेला विरह तिला सहन झाला नसल्याने जबर धक्का बसला आणि यातच तिचासुध्दा मत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उमरा (ता. लोहा) येथे शनिवारी (ता. ११) जानेवारी रोजी घडली. रविवारी (ता. १२) दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

उमरा (ता. लोहा) येथील व्यंकटी यलगंधलवार हे आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होते. दरम्यानच्या काळात त्यांचे निधन झाले. त्यांच्याकडे कोरडवाहू तीन एकर शेती असल्यामुळे दोन्ही मुलांचा संसार चालिवणे अवघड होत होते. त्यामुळे भूजंग यलगंधलवार हा आपल्या कुटुंबियांसह कंधार येथे मोलमजुरी करण्यासाठी गेला होता. तो तिथेच मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होता. दुर्दैवाने त्याचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याची पत्नी व मुल एकटे राहू नये म्हणून त्याची आई देऊबाई ही त्याच्याकडेच राहत होती. 

गरिबीने अखेरपर्यंत सोडले नाही

तर इकडे गावात संभाजी यलगंधलवार हा आपल्या परिवारासह राहत होता. हाताला मिळेल ते काम व शेतात आलेल्या उत्पन्नावर तो कसाबसा आपला परिवार चालवित होता. त्यातच दुष्काळामुळे तर तो चांगलाच खचुन गेला होता. तरीही तो हिम्मत न हारता गरीबीसी दोन हात करीत होता. गरीबीचा गाडा हाकत असतांना तो आजारी पडला. उचारासाठी पैसे नसल्याने तो वेळेत उपचार घेऊ शकला नाही. शेवटी संभाजी यलगंधलवार (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार 
 
हे वृत्त ८३ वर्ष वय असलेल्या आई देऊबाई व्यंकटी यलगंधलवार यांच्या कानावर पडली. मुलाच्या मुत्युचे दु: ख अनावर झाल्याने तिनेही आपला प्राण सोडला. या घटनेमुळे उमरा व लोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत होती. देऊबाई हिचा मृतदेह मुळगावी उमरा येथे आणण्यात आला. मुलाच्या मृतदेहाशेजारी आईचा मृतदेह पहाताच अख्खा गाव शोकाकुल वातावरणात बुडाला होता. घरचा कुटुंबप्रमुख गेल्याने इकडे संभाजीचा परिवार दुखात बुडाला होता. रविवारी (ता. १२) सकाळी आई व मुलाच्या चितेला अग्नी देण्यात आला. यावेळी नातेवाईक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Website: Mother dies after hearing child's death

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com