प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी करणारे जात आहेत सत्तेकडे 

MRUNALINI NANIWADEKAR
बुधवार, 27 मार्च 2019

मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे.

मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे.

प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील रामटेक मतदारसंघातून खासदारकीसाठी अर्ज भरलाय. महाराष्ट्र पोलिस दलातून नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या लक्ष्मीनारायरण यांनी त्यांच्या मूळ राज्यात, आंध्र प्रदेशात जाऊन विशाखापट्टम्‌ शहरातून खासदार होण्यासाठी नशीब अजमावण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या पोलिस आयुक्‍तपदाचा राजीनामा देऊन २००९ च्या निवडणुकीत डॉ. सत्यपालसिंग थेट उत्तर प्रदेशातल्या बागपतमध्ये दाखल झाले, वर्दी काढून ठेवली अन्‌ चौधरी अजितसिंगसारख्या तगड्या उमेदवाराला पराभूत करून संसदेत पोचले. आता लक्ष्मीनारायण त्यांचाच कित्ता गिरवणार आहेत. किशोर गजभिये हे दलित समाजातून वर आलेले गुणवंत. मूळ विदर्भातले. पण नाशिकसारख्या पश्‍चिम महाराष्ट्रातल्या अत्यंत विकसित भागात विभागीय आयुक्‍तपदाची जबाबदारी सांभाळली. नागपूर विद्यापीठाच्या अब्रूची लक्‍तरे वेशीवर टांगणाऱ्या कोहचाडेप्रणीत घोटाळ्यानंतर तेथील कामकाजाला शिस्त लावून आणि विद्यापीठाच्या कामकाजाचा गाडा स्थिरस्थावर करून बाहेर पडले. आता ते राजकारणाच्या लाल मातीत आलेत. या पूर्वी निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. मोहल्ला समितीचा प्रयोग यशस्वीपणे राबविणाऱ्या पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनीही राजकारणात उडी घेतली होती. 

यशापयशाचे हेलकावे
राजकारणाच्या बेभरवशाच्या पाण्यात तारू सोडून देण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाही. ठाणे शहराचा कायापालट करणाऱ्या डॉ. टी. चंद्रशेखर यांनी नागपूर आणि मुंबई विकास प्राधिकरणातील कारकीर्द वादग्रस्त ठरल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला आणि अभिनेता चिरंजीवीच्या प्रजाराज्यम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी गुंटूर लोकसभा मतदारसंघातून नशीब अजमावले. ते यशस्वी झाले नाहीत अन्‌ त्यांच्याच बरोबर याच पक्षातून निवडणूक रिंगणात उतरलेले एन. रामारावही. महाराष्ट्रात आजही लोकप्रिय व्यक्‍तिमत्त्व असलेले अविनाश धर्माधिकारी पुण्यासारख्या प्रज्ञावंतांच्या शहरातून कायदेमंडळात जाण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरले अन्‌ अरुण भाटियासुद्धा. मध्य प्रदेशात एकेकाळी अजित जोगी यशस्वी राजकारणी ठरले अन्‌ आयआरएस परीक्षेत अव्वल यश मिळवणारे अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. संथाल परगण्यात जिल्हाधिकारी पदावर असलेल्या तरुण यशवंत सिन्हांवर तत्कालीन मुख्यमंत्री महामायाप्रसाद सिन्हा भर गर्दीत अपमान करीत ओरडले. तेव्हाच ‘मी राजकारणी होऊ शकेन, पण तुम्ही आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही’, असे प्रत्युत्तर सिन्हा यांनी दिले होते. एकेकाळी ते यशस्वी अर्थमंत्री या नात्याने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकले ते कदाचित प्रशासकीय अनुभवांमुळेच. येसूदास सीलम, सध्या केंद्रात राज्यमंत्री असणारे अल्फान्सो कन्ननथनम असे अधिकारी नंतर मंत्रीदेखील झाले. प्रशासकीय सेवेतून बाहेर पडून महाराष्ट्रात शून्याधारित अर्थसंकल्पासारख्या कल्पना राबवणारे डॉ. श्रीकांत जिचकार हेदेखील असेच एक या मालिकेतले मानाचे पान... 

व्हायचाय अंबारीचा स्वामी
अत्यंत कठीण मानली जाणारी प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रशासन हाकणाऱ्या अधिकाऱ्यांना नेता व्हावेसे का वाटते? तळ्यातून मळ्यात जाण्याचा अनुभव बहुतेक प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, की इंग्रजीतल्या म्हणीप्रमाणे ‘ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साइड’ हे सत्य ठरते? येस सर म्हणण्याऐवजी आदेश देण्याची असोशी नोकरशहा उरी बाळगून असतात का, ते सांगता येणार नाही. जनतेच्या मते अधिकाऱ्यांना मिळणारे व्यवस्थेचे अर्थलाभ केवळ इनकमिंग असतात, तर नेत्यांना मात्र निवडणुकीच्या निमित्ताने आउटगोइंगचा मार्ग अवलंबावा लागतो. तरीही अधिकारी लोकप्रतिनिधी का होऊ पाहतात, हे एक न उलगडणारे कोडे. पण अभिनेत्यांच्या, महिलांच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागाने लोकशाही अधिक समृद्ध होण्याची शक्‍यता बळावते एवढे मात्र खरे. गजभिये गेले काही महिने काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत काम करत होते. त्यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनीच आव्हान दिले आहे. जो काय निर्णय होईल तो होईल, पण कार्यपालिकेतून विधीपालिकेत जाण्याची उर्मी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अंबारीच्या हत्तींना पालखी न वाहता आता अंबारीचा स्वामी व्हायचे आहे.

लोकसभा 2019

Web Title: mrunalini naniwadekar article on Why do you want service to the government


संबंधित बातम्या

Saam TV Live