आमचे पुढील मिशन सावंतवाडी पालिका - राजन तेली

आमचे पुढील मिशन सावंतवाडी पालिका -  राजन तेली

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - जातीचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला बांदा ग्रामपंचायत व आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीने जागा दाखवून दिली. विजयाची नांदी यापुढच्या सर्वच निवडणुकांमध्ये राहील. आता आमचे पुढील मिशन सावंतवाडी पालिका आहे, असे माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लॉरेन्स मान्येकर हे आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्‍याने विजयी झाले. त्यानंतर येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, गोट्या सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, विनायक राणे, चारुदत्त देसाई, दादा साईल, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, भाई सावंत, रुपेश कानडे, प्रकाश मोर्ये, अरविंद सावंत, नारायण गावडे, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, किशोर मर्गज, बंड्या माडकुलकर, बबली सावंत, योगेश बेळणेकर, राजा पडते, राजवीर पाटील आदी पदाधिकारी, तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

निवडणूक निकालाची सुरुवात ही बांदा ते चांदा
तेली म्हणाले, ""बांदा ग्रामपंचायत, तसेच आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणूक हा आमचा ऐतिहासिक विजय आहे. खऱ्या अर्थाने बांदा ग्रामपंचायतीच्या विजयानंतर ही विजयाची पताका कायमस्वरूपी अशी राहिली या निवडणुकीत भाजप या एका पक्षाच्या विरोधात शिवसेनेसह कॉंग्रेस - राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या नावाखाली एकवटलेली होती. या त्यांच्या शक्तीचा कोणताही परिणाम भाजपवर झालेला नाही. माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत हे ही निवडणूक जिंकण्यासाठी या भागात तळ ठोकून होते; मात्र सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी झालेला उमेदवार मान्येकर यांच्यासमोर या सर्वांना झुकावे लागले. आता अनेक निवडणुका येणार आहेत. आता आमचे "लक्ष्य' हे सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक असेल. त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. माजी मंत्री केसरकर यांनी चांदा ते बांदा ही योजना सुरू केली. आता आमची निवडणूक निकालाची सुरुवात ही बांदा ते चांदा अशी असेल. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका या सर्वांच्या ताकदीच्या बळावर निवडून विजयी होणार आहोत. निवडणुकीत पक्षाचे नेते, सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची एकजूट ही विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. भविष्यात विजयाची पताका भाजप कायमस्वरूपी ठेवणार आहे.'' 

कार्यकर्ता टीममुळे यश 
या भागातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणारे मान्येकर यांना मोठ्या मतांनी विजयी केले. यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची टीम ही महत्त्वाची असल्याचे माजी उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी स्पष्ट केले. भविष्यातही सर्वच निवडणुका या अशीच एकजूट दाखवून विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मान्येकरांना आनंदाश्रू अनावर 
भाजपचे विजयी उमेदवार मान्येकर यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांना झालेल्या विजयाचे अश्रू आवरता आले नाहीत. मी 22 दिवस प्रचाराचे काम या ठिकाणी केले. माझ्या विजयात सर्वांचा सहभाग आहे, हे निश्‍चितच मला मान्य करावे लागते. या सर्वांमध्ये फार मोठे योगदान हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Web Title: BJP Next Mission Sawantwadi Corporation Rajan Teli Comment

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com