मुंबईच्या कचऱ्याची अंबरनाथमध्ये शास्त्रोक्त विल्हेवाट 

मुंबईच्या कचऱ्याची अंबरनाथमध्ये शास्त्रोक्त विल्हेवाट 

मुंबई : मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्या 7 हजार 100 टन कचऱ्याची विल्हेवाट कुठे लावायची? असा पेच पालिकेसमोर निर्माण झाला होता. उच्च न्यायालयाने अंबरनाथ येथील 30 एकर जागा ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर मुंबई महापालिकेने जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अंबरनाथमधील करवले येथील 30 एकर जागा लागणार आहे. जागा ताब्यात घेण्याची राज्य सरकारने तयारी दर्शवली असून ताबा मिळताच पालिकेने तीन महिन्यांत प्रकल्पाचे काम सुरू करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जागा ताब्यात घेण्याबाबत पालिकेने राज्य सरकारशी पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

मुलुंडमधील डम्पिंग ग्राऊंड गेल्या महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली आहे. येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारला जाणार आहे. मात्र त्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. मुंबईत रोज मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला डम्पिंग ग्राऊंड कमी पडते आहे. त्यामुळे पालिकेकडे तळोजा आणि अंबरनाथ येथे डम्पिंग ग्राऊंडसाठी सरकारची जागा उपलब्ध झाली आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्यानंतर मुंबईत जमा होणारा हजारो टन कचऱ्याचा भार देवनार आणि कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राऊंडवर पडत आहे. त्यामुळे मुंबईबाहेर असलेल्या अंबरनाथ आणि तळोजा येथील जागा उपलब्ध झाल्याने मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न सुटणार आहे. मात्र तोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. 

स्थानिकांचा विरोध 
अंबरनाथ येथील जागा मिळाल्यानंतर प्रकल्प उभारण्याची तयारी लवकरच सुरू करणार असल्याची माहिती पालिकेच्या घनचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अंबरनाथ येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com