मोटरसायकलवरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 डिसेंबर 2019

मुंबई - परिवहन विभागाच्या सुरक्षेच्या निकषांनुसार शाळेच्या बसेसना परवानगी देण्याबरोबरच मोटरसायकलवरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्याने जर हेल्मेट घातले नसेल, तर गाडी चालवणाऱ्याचा परवाना जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

मुंबई - परिवहन विभागाच्या सुरक्षेच्या निकषांनुसार शाळेच्या बसेसना परवानगी देण्याबरोबरच मोटरसायकलवरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्याने जर हेल्मेट घातले नसेल, तर गाडी चालवणाऱ्याचा परवाना जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या बसेसमध्ये परिवहन विभागाने ठरवलेल्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत; तसेच शाळेच्या बसेसना परिवहन विभागाकडून स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी नसलेली वाहने विद्यार्थ्यांसाठी वापरल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे. 

पालक मोटरसायकलवरून एकाच वेळी दोन ते तीन मुलांना शाळेत सोडायला जातात. येथेही मुलांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अशा मोटरसायकलस्वारांवरही परिवहन विभागाने लक्ष वळवले आहे. नियमांप्रमाणे फक्त एकाच मुलाला मोटरसायकलवर बसवता येणार आहे; तसेच चालकाबरोबरच या मुलाने हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे नसल्यास दंड, परवाना जप्त करणे; तसेच वेळ पडल्यास वाहन जप्त करून न्यायालयीन कारवाईही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या बेकायदा वाहतुकीबद्दल राज्यभरात परिवहन विभागाने 16 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात, शाळेच्या बसेस, व्हॅन्स; रिक्षा तसेच मोटरसायकलवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

यांच्यावर होणार कारवाई 
- चालक आणि सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्यास कारवाई 
- विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षावर नजर 
- विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी 
- आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई 
- परवानाधारक स्कूल व्हॅन, बसने नियमांचा भंग केल्यास कारवाई 

परिवहन विभागाने परवानगी दिलेल्या वाहनांमधूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास; तसेच सुरक्षेचे निकष नसल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोटरसायकलवर चालक आणि सहप्रवासी विद्यार्थ्याने हेल्मेट परिधान केलेले नसल्यास; तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास कारवाई होणार आहे. 
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त 

कंत्राटी रिक्षा ओळखण्याचा पेच 
परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून कारवाईचे निर्देश राज्यभरातील परिवहन कार्यालयांना दिले आहेत. यात मीटरने अथवा प्रिपेड; तसेच शेअर पद्धतीने रिक्षांनी भाडे आकारणे बंधनकारक आहे; मात्र एकाही रिक्षाला स्कूल बस म्हणून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, यात कंत्राटी रिक्षा कशा ओळखाव्यात, असा पेच निर्माण झाला आहे. 

Web Title: Helmets compulsory for students


संबंधित बातम्या

Saam TV Live