इम्रान खान यांचा चर्चेबाबतचा हेतू स्वच्छ असेल तर मोदींनी चर्चा करावी : राज ठाकरे

 इम्रान खान यांचा चर्चेबाबतचा हेतू स्वच्छ असेल तर मोदींनी चर्चा करावी : राज ठाकरे

मुंबई : पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची तातडीने सुटका केली आणि सीमारेषेवरचा गोळीबार थांबवला तर त्याचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चर्चेबाबतचा हेतू स्वच्छ आहे असे म्हणता येईल आणि असे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेची आलेली संधी गमावता कामा नये, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

याबाबत राज यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. अापल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन त्यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुनही हे पत्र व्हायरल करण्यात आलं आहे.

हे पत्रक असे......

सस्नेह जय महाराष्ट्र,
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'चर्चेतून' मार्ग काढण्याचं केलेलं आवाहन माझ्या पाहण्यात आलं.

अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देखील केलं होतं. ह्या हल्ल्यात आपण आपले सीआरपीएमचे ४० जवान गमावले होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यकच होता आणि त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं.

काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्यांवर चर्चेस तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ ह्याच्या काळात आली होती. अटलजींनी 'सदा-ए-सरहद' ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरु केली, समझोता एक्स्प्रेस सुरु केली, आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवानं ह्या चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत.

जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट्र चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत?

युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मीरी जनतादेखिल भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारे नाही. अतिरेक्याना ठेचलंच पाहिजे आणि ते देखिल निष्ठूरपणे, म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशांत शांततेचं वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.

पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल त्यांनीच उचलायला हवं, ते म्हणजे त्यांच्या कैदेत असलेल्या आमच्या वैमानिकाला, अभिनंदन यांना त्यांनी तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमारेषेवरचा गोळीबार तात्काळ थांबवला पाहिे. जर ह्या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल की इम्रान खान ह्याचे हेतू स्वच्छ आहेत. आणि तसं घडलं तर मात्र श्री. नरेंद्र मोदींनी देखील ही संधी गमावता कामा नये.

मी पुन्हा एकदा सांगतो की युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं.

आपला नम्र,
राज ठाकरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com