आर्थिक राजधानी असलेली मंबई बनली कोरोनाची राजधानी! कोरोनाच्या राक्षसानं कोणालाच सोडलं नाही

साम टीव्ही
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

आता बातमी आपल्या मुंबापुरीची, कायम उत्साहाने धावणारी मुंबापुरी शांत झालीय. कोरोनाच्या फेऱ्यानं मुंबईचा चेहराच बदलून गेलाय. आर्थिक राजधानी कशी बनलीय कोरोनाचीही राजधानी...

जगासह देशभरात कोरोनाचा कहर माजलाय. जगासह देशाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत कोरोनाच्या राक्षसाचा थयथयाट सुरूय. त्यातून आपली मुंबापुरी कशी वाचेल. मुंबईतही कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढलाय. कोरोनाचा फेरा मुंबईतल्या प्रत्येक स्तरावरच्या माणसापर्यंत पोहोचलाय. कोरोनाने ना चाकरमान्यांना सोडलं, ना उद्योजकांना सोडलं किंवा ना झगमगत्या दुनियेतील सेलिब्रिटींना सोडलं. पण या सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की, या संकटकाळातही तळहातावर जीव घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही कोरोनानं सोडलं नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या देवदूतांनाही या निष्ठूर कोरोनानं विळखा घातलाय.

महामुंबईत महाकोरोना, आधार असणाऱ्यांनाही कोरोनानं गरासलं

  • आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरलाच कोरोना झालाय.
  • अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची ने-आण करणाऱ्या बेस्ट परिवनच्या कर्मचाऱ्याला कोरोनाने ग्रासलंय.
  • त्याचप्रमाणे रस्ते, परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारालाही कोरोनानं सोडलेलं नाहीय.
  • तर तिकडे जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाचा विळखा पडलाय.
  • त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरीच बसावं म्हणून जीव मुठीत घेऊन सेवा बजावणाऱ्या आणि स्वत:च्या कुटुंबाला सोडून राबणाऱ्या पोलिसालाच कोरोना झालाय.

देशातील कोणत्याही शहरापेक्षा मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी आता कोरोनाचीही राजधानी बनून गेलीय. 

खरंतर, मुंबापुरी ही देशातल्या प्रत्येकाला आसरा देते. आधार देते... देशातल्या प्रत्येकाच्या पोटासाठीची वाट मुंबईतूनच जाते असं म्हटलं जातं.  देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक मुंबईत राहतात. त्यामुळे गावाकडे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाला घोर लागलाय. 

प्रत्येकाचा आधारवड असलेली मुंबापुरी कोरोनाच्या विळख्यात सापडलीय. जगाच्या आणि देशाच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या मुंबापुरीला कधी नव्हे ते असले दिवस बघायला मिळतायत. कायम गजबलेली आणि धावणारी मुंबापुरी आता भयाण, उजाड, सामसूम झालीय... पण मुंबईकरानो घाबरू नका, ही मुंबापुरी आहे... तिचं दुसरं नाव लढवय्यी आहे... मोठमोठ्या संकटांच्या छाताडावर बसून मुंबापुरी पुन्हा धीरोदात्तपणे उभी राहिल्याचा इतिहास आपल्यासमोर आहे... त्यामुळे हेही दिवस जातील... धीर धरा... संयम पाळा... घरातच बसा... कारण विषय मुंबापुरीचा आहे आणि तितकाच तो तुमच्या-आमच्या सारख्या मुंबापुरीच्या लेकरांचाही आहे...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live